श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन; सुक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक भेट
पूर्णा (प्रतिनिधी) : येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात विविध विभागांतर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व उपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मानवविद्या शाखेअंतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उपक्रमशीलता अंगीकारावी, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वास्तव जीवनातील भान हरपू नये, असा सल्ला दिला. तसेच राज्यशास्त्र विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील संविधान दालनास भेट देत भारतीय संविधानाचे महत्व जाणून घेतले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर, डॉ. शिवसांब कापसे, डॉ. संजय दळवी, डॉ. रेखा पाटील, डॉ. वर्षा धुतमल, प्रा. शेख नसीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ओंकार चिंचोले यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. विनोद कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मनीषा पाटील यांनी केले. आयोजनात शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब भालेराव, मंचकराव वळसे आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान, महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने बी.एससी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी शास्त्रीनगर येथील बेकरी उद्योग व महावीरनगर येथील विवेक पॅथॉलॉजी लॅबला भेट देऊन प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया व प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीचा अभ्यास केला.
बेकरी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ब्रेड, बिस्किटे, केक आदी उत्पादनांची प्रक्रिया, यीस्टच्या साह्याने होणारी किण्वन क्रिया आणि बेकिंगचे वैज्ञानिक तत्त्व यांचा सखोल अभ्यास केला. तर पॅथॉलॉजी लॅब भेटीदरम्यान त्यांनी हिमॅटॉलॉजी अनालायझर, पीसीआर मशीन, इलायझा रीडर आदी आधुनिक उपकरणांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. लॅब तज्ञ श्री. नीरज आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील सुरक्षा, स्टरलायझेशन तंत्र आणि रोगनिदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून शैक्षणिक तसेच प्रायोगिक अनुभव संपादन करण्याची संधी मिळाली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभागप्रमुख डॉ. दैवशाला कमठाणे, डॉ. रवींद्र राख, उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, डॉ. संजय दळवी व पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी दोन्ही उपक्रमांसाठी विशेष सहकार्य दिले.