हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांचे आज पहाटे सुमारास देहावसान
अस्सल वारकरी भजनानंदी व वारकरी आचरणातील ‘मर्यादा पुरुषोत्तम’ काळाच्या पडद्याआड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…..
परळी पंचक्रोशी तसेच परभणी,बीड जिल्ह्यासह आळंदी-पंढरपुरसह संपूर्ण वारकरी विश्वात आदरणीय व सर्व परिचित असलेल्या संत सोपानकाका महाराज उखळीकर भजनी फडाचे प्रमुख हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांचे आज दि.२७ पहाटे ५ वा.सुमारास देहावसान झाले. वारकरी संप्रदायाचा खराखुरा पाईक व वारकरी आचरणातील सर्व मर्यादा आयुष्यभर तंतोतंत पालन करणारा अस्सल वारकरी भजनानंदी व आचरणातील वारकरी ‘मर्यादा पुरुषोत्तम’ काळाच्या पडद्याआड गेला असल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.
हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज सोपानकाका महाराज उखळीकर यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीस्वास्थ्य ठिक नव्हते. यातच वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार हभप केशव महाराज उखळीकर यांचे चुलते व प्रसिद्ध किर्तनकार हभप विठ्ठल महाराज उखळीकर, विश्वंभर महाराज उखळीकर, दिनानाथ महाराज उखळीकर यांचे ते वडील होत. परळी पंचक्रोशीतील थोर संत गु.सोपानकाका महाराज यांच्या परंपरेची तसेच तीनशेहून अधिक वर्षाची वारकरी परंपरा असलेल्या उखळीकर परंपरेचे निष्ठेने आयुष्यभर त्यांनी पालन केले.मराठवाड्याच्या विविध भागात त्यांना गुरुस्थानी मानणार्या लोकांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे.
श्री संत केदारी महाराज उखळीकर वारकरी फडपरंपरेतील भजनातील “अस्सल हिरा” अशी ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांची ओळख आहे. कीर्तन, गाथा भजन, काकडा, हरिपाठ, जागर यामध्ये कोणत्या भजनात कोणती शुद्ध वारकरी सांप्रदायिक चाल कशी म्हणावी याचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज उखळीकर हे होते.अत्यंत संयमी, मितभाषी, निस्पृही, शांतीप्रिय, वैराग्य युक्त अशा संतलक्षणाचे हे व्यक्तिमत्व होते. संगीत हा त्यांचा श्वास व भजनानंद हा आयुष्यभर ध्यास घेऊन त्यांनी वारकरी क्षेत्रात काम केले. आकाशवाणीवरही त्यांचे गायन व मृदंग वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.परंपरेने चालत आलेल्या संप्रदायाचा वारसा निष्ठेने चालवत गावोगावी पायी फिरून, निरपेक्ष वृत्तीने वारकरी विचार रुजवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. ‘सहज बोलणे हाची उपदेश’ या सुत्रांनुसार काम करत त्यांनी हजारो लोकांना सन्मार्गाला लावले.गावोगावी त्यांना श्रद्धांस्थान माणणारांची मोठी संख्या आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर परळी येथे दुपारी ३ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काकडा आरतीचे भजन करत घेतला अखेरचा श्वास…..
‘शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी” या उक्तीला सार्थ ठरवीत पहाटे काकड्याचे भजन करीत असताना ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांनी आपला देह श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विलीन केला. त्यांनी संपूर्ण आयुष्यात “तुका म्हणे येथे भजन प्रमाण। काय थोरपण जाळावे ते” या जगद्गुरूंच्या वचनाचा सार्थ अभिमान ठेवत आपली भजनाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवली.