लाडक्या बहीण-भाऊ शेतकर्‍यांसाठी शंभरवेळा तुरुंगात जाण्यास तयार आहे-मुख्यमंत्री शिंदे

Spread the love

परभणीत महायुतीची प्रचार सभा

परभणी/प्रतिनिधी
आमचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व योजना बंद करत दोषी असणार्‍यांना तुरुंगात टाकू, असा इशारा महाविकास आघाडीवाले देत आहेत. हिंमत असेल, तर या सर्व कल्याणकारी योजनांची खुशाल चौकशी करावी. लाडक्या बहीण-भावांसाठी तसेच शेतकर्‍यांसाठी आपण एकदा नव्हे, शंभरवेळा तुरुंगात जाण्यास तयार आहोत, असे सांगत श्री.शिंदे यांनी विरोधकांनाच आव्हान दिले.
परभणी येथे मुख्यमंत्र्यांची महायुतीची प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे परभणी मतदारसंघातील उमेदवार आनंद भरोसे, जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह विजय वरपूडकर, माजी आ.हरिभाऊ लहाने, प्रताप देशमुख, राजू कापसे, बाळासाहेब जाधव, व्यंकटराव शिंदे, माणिक पोंढे, धम्मदीप रोडे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की,
शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवून आणण्याचे काम आम्ही केले. त्याची शान वाढविण्याचे काम आता करायचे आहे. परभणीच्या स्थानिक आमदाराने जनतेचा भ्रमनिरास केला असून काहीही काम करायचे नाही, दमडीचे काम करायचे आणि त्याचे श्रेय लाटण्यासाठीच पुढे यायचे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे परभणीला विकासाच्या वाटेवर नेऊन विकासाची पर्वणी साधा, असे आवाहनही केले.महायुती सरकारने शेतकर्‍यांच्या वीज बिल माफीपाठोपाठ आता 10 कलमी कार्यक्रमात कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला 2100 रूपये जमा केले जाणार आहेत. विरोधकांनी आमच्या कल्याणकारी योजनांबद्दल अपप्रचार चालवला. लवकर लवकर खात्यात जमा झालेले पैसे काढा नाहीतर सरकार काढून घेईल, असाही खोटा प्रचार केला. परंतू आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. कोणी कोर्टात जाऊ दे, कोणी कुठेही गेले तरी ही योजना बंद होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या आणि पैशांच्या राशीत लोळणार्‍यांना काय समजणार दीड हजाराची किंमत? असा सवाल करत त्याची किंमत केवळ लाडक्या बहिणींनाच कळते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी श्री.भरोसे, श्री.वरपूडकर, माजी आ.लहाने, श्री.देशमुख यांनी मनोगत मांडले. सुत्रसंचालन सुनील तुरूकमाने यांनी केले.

You cannot copy content of this page