परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना

Spread the love

दगडफेक, रेल्व रोको; घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता

परभणी(प्रतिनिधी) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा मंगळवारी १० डिसेंबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास एका माथेफिरुने दगड मारून काच फोडला. घटनेचे परभणी शहरासह जिल्ह्यात तिव्र पडसाद उमटून सरै तणावाची स्थिती निर्माण झाली होती.याप्रकारामुळे संतप्त झालेल्या अनुयायांनी परभणी शहरात रास्ता रोको करुन संबंधित माथेफिरुवर कारवाईची मागणी केली. मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस समोर आंदोलन कर्त्यांनी रेल्वे आडवून आंदोलन केले.पोलीसांनी घटनास्थळावरुन आरोपीस ताब्यात घेतले असून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.
परभणी शहरात ऐन जिल्हाधीकारी कार्यालयासमोरील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा आहे.या पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्समध्ये संविधानाची एक प्रतिकृती आहे. मंगळवारी १० रोजी ५ वाजेच्या समयी एका माथेफिरुने या प्रतिकृतीवरील काचेला दगड मारुन काच फोडून संविधान प्रतिकृतीची विटंबना केली.या घटनेची माहिती परभणी शहरात वा-यासारखी पसरली माहीती मिळताच मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले. मोठ्या संख्येने जमलेल्या अनुयायांनी विटंबना करणाऱ्या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान शहरातील काही भागात दगडफेकीची घटना देखील घडल्याचे वृत्त आहे. काही अनुयायांनी परभणी स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस रोखुन आंदोलन सुरू केले. विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळांहुन आरोपीस ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.दरम्यान घटनास्थळी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देवून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून परिसराची पाहणी केली. संविधानाची प्रतिकृती नव्याने बसविण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.सर्वांनी शांतता पाळली असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
पूर्णेत घटनेने खळबळ बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद
परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेचे लोण संबंध जिल्ह्यासह पूर्णा शहरात धडकले.वृत्त धडकताच शहरातील बाजारपेठ व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली.मात्र बाजारपेठेत अचानक बंद कशी काय झाली.यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला रस्त्यावर लोक सैरावैरा पळत सुटले वेळीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी शहरात पोलीस पथकांच्या मदतीने सर्वत्र शांततेत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील अनुयायांयी जमा होऊन घटनेचा निषेध व्यक्त केला.परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी ११ रोजी सकाळी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे . सर्वांनी शांतता पाळावी असं आवाहन रिपाइंचे नेते प्रकाशदादा, कांबळे, उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, सुनील मगरे,तुषार गायकवाड यांनी केले.

You cannot copy content of this page