महायुतीच्या माध्यमातूनच स्था.स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार-प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा
परभणी ता.१९(प्रतिनिधी)
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. ते परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १९)आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर,मा.आ.विजय भांबळे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावर दैदिप्यमान यश मिळविले आहे. आता दीर्घ प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयांचा आढावा, सभासद नोंदणी आणि संघटना बांधणी यासाठी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या संवाद मेळाव्यास परभणी जिल्ह्यात उस्फुर्त असा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश देखील केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने राहिला असल्याचेही यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान लोकसभा निवडणूक ईव्हीएमच्या माध्यमातूनच आणि विधानसभा निवडणुका देखील ईव्हीएमच्या माध्यमातूनच झाल्या मात्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममुळे पराभव झाल्याचे विरोधकांचे म्हणणे म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.