बीड जिल्ह्यातील वाळू माफिया विरुद्ध कडक कारवाई करा – धनंजय मुंडे यांचे पोलीस आणि महसूल प्रशासनाला निर्देश
बीड जिल्ह्यातील वाळू माफिया विरुद्ध कडक कारवाई करा – धनंजय मुंडे यांचे पोलीस आणि महसूल प्रशासनाला निर्देश
पाठीशी घालणाऱ्याची गय केली जाणार नाही
मुंबई (दि. ०६) —- : बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या तसेच त्यातून घडलेल्या अपघातांच्या तक्रारी गंभीर असून पोलीस व महसूल प्रशासनाने अशा वाळू माफियांविरुद्ध तातडीने कडक कार्यवाहीचे सत्र सुरू करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलिस व महसूल प्रशासनास दिले आहेत.
महसूल किंवा पोलीस खात्यातील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार जर उघडकीस आला तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही, प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात यावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात चोरट्या मार्गांनी अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सध्या वाढताना दिसत आहेत. त्यातच गेवराई तालुक्यात एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा वाळूच्या वाहनाने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे कान टोचले आहेत.
जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक व माफियागिरी अजिबात चालणार नाही, असे सांगताना अशा प्रकारच्या माफियागिरीवर कठोर कार्यवाही करावी तसेच यात जाणीवपूर्वक कसूर करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश ना. मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.