ना खचले ना मागे हटले, आरोप प्रत्यारोपांच्या भडीमारानंतरही धनंजय मुंडे यांचे कामकाज सुरूच!
ना खचले ना मागे हटले, आरोप प्रत्यारोपांच्या भडीमारानंतरही धनंजय मुंडे यांचे कामकाज सुरूच!
जातपडताळणी प्रक्रियेतील तक्रार निवारण, वैद्यकीय मदत अशा अनेक विषयात घातले लक्ष
मुंबई (दि. १६) —- : खोट्या नाट्या आरोप प्रत्यारोपांचा भडिमार, बदनामी या सगळ्या बाबींना धैर्याने सामोरे जाणारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गेल्या चार दिवसात कुठेही खचलेले किंवा मागे हटलेले निदर्शनास आले नाही. उलट रोजच्याप्रमाणे विभागातील व बीड जिल्ह्यातील विविध कामकाजात त्यांनी लक्ष घातल्याचे आढळून आले.
ग्रामपंचायत निवडणूक, विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया यामुळे जातपडताळणी प्रक्रियेवरील ताण वाढताना दिसत आहे. त्यातूनच राज्याच्या विविध भागातून जात प्रमाणपत्र पडताळणी संबंधित तक्रारी प्राप्त होत असल्याचे समजताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे.
दि. १३, १४ आणि १५ जानेवारी या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत कसोटीचा काळ ठरलेल्या तीन दिवसातही धनंजय मुंडे यांनी त्यांचे कामकाज मात्र सुरूच ठेवले होते. अनेक जिल्ह्यांच्या जात पडताळणी समिती कार्यालयांमध्ये दि. १४ व १५ रोजी मोठी गर्दी झाल्याने ना. मुंडेंनी तेथील अधिकाऱ्यांना रात्री उशिरा पर्यंत काम करून अर्ज निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.
ऑनलाईन प्रक्रियेमध्ये असलेल्या त्रुटी तातडीने दुरुस्त करून पडताळणी यशस्वी झालेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या इमेलवर वेळेत पाठवले जावे यासाठीही धनंजय मुंडे यांनी बार्टी स्तरावरून आदेश दिले आहेत.
१० वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही तर आज अडचण येऊ नये यासाठीही मुंडेंच्या कार्यालयाने सीईटी विभागाकडून २० जानेवारी पर्यंत मुदत वाढवून घेतली आहे.
याशिवाय या चार दिवसात धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसही हजर होते. त्याआधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या बैठकीस उपस्थित राहून परळी मतदारसंघातील दाखल प्रस्ताव मंजूर करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी चर्चा देखील केली होती. तसेच एकीकडे राजीनामा मागण्यावरून गदारोळ सुरू असताना गुरुवारी मुंडे पक्ष कार्यालयातील जनता दरबारात आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवताना देखील दिसले होते.
परळी मतदारसंघ व बीड जिल्ह्यात आजपासून कोव्हिड लसीकरणास प्रारंभ झाला असून जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा व प्रत्यक्ष लसीकरणाचा धनंजय मुंडे सातत्याने आढावा घेत आहेत. मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांसाठी धनंजय मुंडे यांच्या वतीने कोरोना हेल्प सेंटर व ऑनलाईन वैद्यकीय मदत कक्ष चालविण्यात येतो. या मदतकक्षाचे कामकाज या प्रसंगात देखील सुरू असून, परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सोमेश फड या तरुणाला मुंडेंच्या वैद्यकीय मदत कक्षाने रुग्णालयाच्या खर्चासाठी ५० हजार रुपयांची मदत एका योजनेतून दि. १४ च्या मध्यरात्री मंजूर करून दिल्याचे स्वतः सोमेश फड यांनी सांगितले आहे.
मलबार हिल येथील चित्रकूट या मुंडेंच्या शासकीय निवासस्थानावर मतदारसंघ, बीड जिल्हा व राज्यातील त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते तसेच नागरिकांची रेलचेल आहे. या संकटांच्या काळातही भेटायला आलेल्या नागरिकांना धनंजय मुंडे हे त्यांच्या कामाबद्दल विचारपूस करताना दिसल्याने अनेकांना नवल वाटले! घराबाहेर अनेक माध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरामन पूर्णवेळ थांबलेले असतात, प्रत्येकवेळी बाहेर जाताना व येताना धनंजय मुंडे व त्यांचे सहाय्यक या सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी करतात.