जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुली असतांना प्रशासनाला वैद्यनाथ मंदीराचे वावडे कशामुळे –चंदुलाल बियाणी
जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुली असतांना
प्रशासनाला वैद्यनाथ मंदीराचे वावडे कशामुळे –चंदुलाल बियाणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात दर्शन मर्यादा निश्चित करण्याबाबत असलेल्या सुचनेकडे लक्ष वेधले
परळी । प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुले असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे कारण देत ८ ते १६ मार्च या महाशिवरात्रीच्या कालावधीत १२ ज्योतीर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदीर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. पाठोपाठ दुसरा आदेश काढून २२ मार्च पर्यंत दर्शनासाठी देऊळ बंद असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. एकीकडे जिल्ह्यातील सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुली असतांना परळीतील वैद्यनाथ मंदीरात दर्शनावर निर्बंध का? असा सवाल वैद्यनाथ देवस्थान विकास कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केला आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्चला दिलेल्या नव्या आदेशात कलम ६ मध्ये धार्मिक संस्था व्यवस्थापनाने येणाऱ्या भाविकांच्या प्रतितास संख्येबाबत मर्यादा ठरवावी व नियम, अटी पाळून प्रवेश द्यावा असे नमुद केलेले आहे.
राज्यात व जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बीड यांनी वैद्यनाथ मंदीर एकाच महिन्यांत सलग दुसऱ्यांदा भाविकांसाठी दर्शन घेण्याकरीता निर्बंध घालत बंद ठेवले आहे. महाशिवरात्रीच्या काळात श्रींच्या दर्शनाची परंपरा असते, देशभरातून भाविक येथे येत असतात. तत्कालीन परिस्थितीत मंदीर बंद ठेवल्याने पाच लाखांपेक्षा अधिक भाविक श्रींच्या दर्शनापासून वंचित राहिले आहेत. वास्तविक पाहता १६ मार्च नंतर मंदीर भाविकांसाठी पुन्हा खुले होईल असे वाटत असतांनाच नवा आदेश काढून २२ मार्च पर्यंत देऊळ बंद ला मुदतवाढ देण्यात आली. हा एकप्रकारे शिवभक्तांवर अन्याय असून, बीड जिल्ह्यातील सर्वच मंदीरे भाविकांसाठी खुले असतांना श्री वैद्यनाथ मंदीर खुले ठेवण्यास प्रशासनाला कशाचे वावडे आहे? असा प्रश्न चंदुलाल बियाणी यांनी विचारला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी बीड यांनी १६ मार्चला दिलेल्या नव्या आदेशात कलम ६ मध्ये अगदी स्पष्ट शब्दांत धार्मिक संस्था व्यवस्थापनाने येणाऱ्या भाविकांच्या प्रतितास संख्येबाबत मर्यादा ठरवावी व जेणेकरून सामाजिक अंतर पाळणे शक्य होईल, त्याकरीता ऑनलाईन आरक्षण सुविधा चालू करण्यात यावी असे म्हटले आहे. अशा ठिकाणी प्रवेश देणेबाबत विनामास्क प्रवेश देवू नये, शरिराचे तापमान तपासून प्रवेश द्यावा, सॅनिटायझरची व्यवस्था करावी तसेच भाविक मास्क वापरतात किंवा नाही हे पाहण्याची यंत्रणा उपलब्ध आहे याची खात्री करावी असे नमुद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सुधारीत आदेशानुसार वैद्यनाथ मंदीर सुरू करणे गरजेचे होते. वैद्यनाथ मंदीरात ऑनलाईनची सुविधाही नाही आणि ऑफलाईनही भाविकांना दर्शन घेता येत नाही, याकडेही बियाणी यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारीत आदेश काढत व दर्शनासाठी आवश्यक असलेल्या नियम व अटी लावून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन भाविकांसाठी खुले करावे असे आवाहन केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात आल्या आहेत.