पेट-२ ची परीक्षा सेंटर वर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी :- अभाविप
पेट-२ ची परीक्षा सेंटर वर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी : अभाविप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ प्रशासनाने PET परीक्षेसंदर्भात अतिशय चुकीचा निर्णय घेऊन विद्यापीठाची संशोधनाची गुणवत्ता घसरवण्याचे काम केले आहे. PET २ हा पेपर पूर्वीच्या प्रमाणे ऑनलाइन घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.राज्य सरकार ने १० वी व १२ वी च्या परीक्षा देखील ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे,तरी फक्त सहा हजार विद्यार्थ्यांची परीक्षा सेंटर वर ऑनलाईन पद्धतीने का घेतली जाऊ शकत नाही? PET १ मध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात कॉपी करून पेपर दिला. त्यामुळे PET २ हा पेपर ऑनलाइन मात्र सेंटर वर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला ज्याचे गुणवंत विद्यार्थ्यांनी व अभाविप ने स्वागत केले. मात्र आज दबावाला बळी पडून गुणवत्तेला चिरडण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करत आहे. ज्या डॉ. बाबासाहेबांनी गुणवत्ता मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आज त्याच महामानवाच्या नावाने असलेल्या विद्यापीठात गुणवत्ता मारण्याचे काम केले जात आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अंकिता पवार यांनी केले. या निर्णयामुळे संशोधनाचा दर्जा घसरवण्याचे काम होत आहे. विद्यापीठाला मागील NAAC कडून संशोधनाच्या गुणवत्तेसाठी सर्वात कमी गुण मिळाले आहेत. आता या निर्णयामुळे तर नक्कीच संशोधन दर्जा रसातळाला जाणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी थोडा तरी विचार विद्यापीठ प्रशासनाने करायला हवा होता अशी प्रतिक्रिया महानगर मंत्री निकेतन कोठारी यांनी दिली. हा निर्णय मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारा आहे तरी आपण शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठाचे नाव लक्षात घेता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सेंटर वर घेण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर करते.