कर्जत येथे ‘आदर्श पत्रकार संघ’पुरस्कार वितरण सोहळा

Spread the love

मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे-जिल्हाध्यक्ष प्रभु दिपके

परभणी,ता.१६| प्रतिनिधी;

अखिल भारतीय पातळीवर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘पत्रमहर्षी रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा’ तसेच ‘वसंतराव काणे आदर्श तालुका’ पुरस्कारांचे वितरण यंदा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उत्साहात पार पडणार आहे. या समारंभास परभणी जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके यांनी केले आहे.

कर्जत येथील‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ‘रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ या मानाच्या पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संघटनांचा या वेळी सन्मान केला जाणार असून, राज्यभरातील पत्रकारांसाठी हा कार्यक्रम प्रतिष्ठेचा मानला जातो.समारंभाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख असतील. प्रदेश सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणीतील राजकुमार ठोके (हटेकर), कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे, कोषाध्यक्ष मोईन खान, विठ्ठलराव वडकुते, बंडू बनसोडे आदी पदाधिकाऱ्यांनीही पत्रकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.रायगड जिल्ह्यात होणाऱ्या या सोहळ्यामुळे राज्यातील पत्रकारांना एकत्र येऊन परस्पर संवाद साधण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पत्रकारितेतील मूल्यसंवर्धन, नैतिकतेची जपणूक आणि समाजाभिमुख दृष्टी अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी नमूद केले.परभणीसह राज्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यातील प्रतिनिधींची उपस्थिती उल्लेखनीय राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page