Beedगेवराई तालुक्यातील उपसरपंच बरगेंचा मृतदेह कारमध्ये आढळला
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गाव हद्दीतील घटना;हत्या की आत्महत्या.? चर्चेला उधाण
गेवराई, ता.९ (प्रतिनिधी)Beed Crime News बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३८) यांचा मृतदेह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावच्या शिवारात कारमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ कारमध्येच पिस्तुल सापडल्याने ही घटना हत्या की आत्महत्या? असा संशय उपस्थित होत आहे.
घटनास्थळावर कारवाई
सोमवारी खासगी कामानिमित्त बरगे हे कारने बार्शीला गेले होते. मंगळवारी (ता.९) सकाळी सासुरे गाव शिवारात त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदन गावडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला.
पोस्टमार्टममध्ये गोळी लागल्याचे स्पष्ट
प्राथमिक पोस्टमार्टम अहवालानुसार, गोविंद बरगे यांच्या डोक्याला पिस्तुलाची गोळी लागल्याचे आढळले आहे. घटनास्थळीच मृतदेहाच्या शेजारी पिस्तुलही आढळले. त्यामुळे ही स्वतःची गोळी झाडून आत्महत्या आहे की कुणीतरी त्यांची हत्या केली? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यात भीतीचे वातावरण…!
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात अपहरण आणि हत्येंच्या घटनांनी बीड जिल्हा अक्षरशः हादरुन निघाला आहे.अनेक प्रकरणांच्या जखमा अजूनही ताज्याच असताना उपसरपंच बरगे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
❓ अनेक प्रश्न अनुत्तरित
बरगे यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत –
- त्यांचा कोणाशी वाद होता का?
- ते बार्शीला नेमके कोणत्या कामासाठी गेले होते?
- त्यांच्या सोबत अजून कोणी होते का?
- कारमध्ये सापडलेले पिस्तुल त्यांचेच होते का?
- त्यांचे कुणासोबत संबंध होते का.?
या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांचा तपास सुरू…
पोलिसांनी या घटनेला गंभीर दृष्टीने घेतले असून हत्या की आत्महत्या याचा तपास जलदगतीने सुरू केला आहे. मात्र, अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत याबाबत निश्चित काही सांगता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. उपसरपंच गोविंद बरगे यांच्या मृत्यूमुळे गेवराई तालुक्यात शोककळा पसरली असून, संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.











