कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे – धनंजय मुंडे
कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे – धनंजय मुंडे
धनंजय मुंडेंनी घेतला बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा, ऑक्सिजनसाठी बीड जिल्हा होणार आत्मनिर्भर
ऑक्सिजन बेड वाढविणे, खाजगी रुग्णालय अधिग्रहण, रेमडीसीवीर वितरण नियंत्रणात आणण्याचे सक्त निर्देश
बीड जिल्हा हेच माझे कुटुंब, हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा – मुंडेंची भावनिक साद
बीड (दि. १२) —- : कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे व निर्वानीचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ना. धनंजय मुंडे बोलत होते.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, मृत्युदर देखील वाढला असुन, योग्य उपचार, बेड ची उपलब्धता यासह ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शनची वेळेवर व रास्त भावात उपलब्धी या सर्वच बाबींवर ना. मुंडेंनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनवू, जिल्ह्यात कुठेही एक लिटर ऑक्सिजन देखील कमी पडणार नाही, अशी खात्री यावेळी ना. मुंडेंनी दिली. तर दुसरीकडे रेमडीसीविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, साठेबाजी व काळाबाजार करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत, याबाबत प्रभावी यंत्रणा राबवून दैनंदिन तत्वावर नियंत्रण समिती स्थापन करावी, ज्यांना आवश्यक त्यांनाच इंजेक्शन व तेही रुग्णालयामार्फत ही प्रणाली तातडीने विकसित करावी. जिल्ह्यात आलेले इंजेक्शन व वितरण याचे दररोज ऑडिट या यंत्रणेमार्फत केले जावे, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
रुग्णांच्या व्यवस्थापणापासून ते इतर सर्वच बाबींमध्ये प्रशासकीय व्यक्तीकडून हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यास त्यावर कार्यवाही करू, कोणीही व्यक्ती किंवा समूह रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास ना. मुंडेंनी दिले आहेत.
दोन दिवसात ऑक्सिजनचे आणखी बेड वाढवा…
जिल्हा प्रशासनाकडे २५०० ऑक्सिजन बेड तयार आहेत. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर येथील बेड संख्या मागील काही दिवसात रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने कमी करण्यात आली होती, मात्र आताची रुग्णसंख्या पाहून, ऑक्सिजनचे सुविधा असलेल्या बेडस ची संख्या तातडीने वाढविण्यात यावी, बेडची संख्या कमी पडत असेल तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन तिथे सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही मुंडेंनी प्रशासनास दिले आहेत. याव्यतिरिक्त तालुका स्तरावर मंगल कार्यालये किंवा तत्सम आस्थापना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन तिथे विलगिकरण कक्ष स्थापन करावेत असे निर्देशही मुंडेंनी दिले आहेत.
या बैठकीस आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, आ. सुरेश धस, आ. सौ. नामिताताई मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, एसआरटी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे यांसह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बीड हेच माझे कुटुंब; जनतेला हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा
“मागील वर्षी बीड जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला प्रत्येक निर्णयात सहकार्य केले, त्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होती, मात्र गेल्या तीन महिन्यात ही संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने भरमसाट वाढली आहे, मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, संपूर्ण बीड जिल्हा हेच माझे कुटुंब आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या जीवांचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी मंत्री म्हणून नाही तर, कुटुंबातील सदस्य म्हणून हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा”, अशी भावनिक साद यावेळी बोलताना ना. मुंडेंनी जिल्हा वासीयांना घातली आहे.
अंबाजोगाई प्रमाणे बीड मध्येही होणार कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा
कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असल्याने, अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव प्रयोगशाळेवर याचा ताण वाढला असून, चाचण्यांचे निकाल प्राप्त व्हायला वेळ जातो आहे, यामुळे बीड येथील जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे नव्याने पाठवून तो तातडीने मंजूर करून घेतला जाईल व येत्या काही दिवसातच त्यासाठीची सामग्री उपलब्ध करून बीड जिल्हा रुग्णालयात प्रतिदिन १२०० चाचण्या केल्या जातील अशी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येईल असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बीड मध्ये १५ एप्रिल रोजी महारक्तदान शिबीर
धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि. १५ एप्रिल (गुरुवारी) सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या रक्तदान शिबिरामध्ये सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, समतादूत, अन्य विभागातील शासकीय अधिकारी – कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.