बीड जिल्हा रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून संजीवनी
बीड जिल्हा रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून संजीवनी
बीड जिल्हा रुग्णालयास नाथ प्रतिष्ठान मार्फत दिले 250 रेमडीसिविर इंजेक्शन
बीड (दि. 170) — : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा रुग्णालयास अगदी संजीवनी स्वरूपात मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडीसिविर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याची माहिती मिळताच ना. मुंडे यांनी आपल्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयात रेमडीसीवीरचे 250 इंजेक्शन मोफत दिले आहेत.
रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा व रुग्णसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात सातत्याने होत असलेल्या मागणीमुळे राज्यात सर्वत्रच आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व यंत्रणा कामाला लावून रुग्णांच्या उपचारात कुठेही काहीही कमी पडू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न चालवले आहेत.
जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनची कमतरता आहे याची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठान मार्फत 250 इंजेक्शन शासकीय नियमांच्या आधीन राहून मोफत उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी दिली आहे.
जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शासनाच्या कोट्यातून आलेली रेमडीसीवर देण्यात येतात. मात्र हा पुरवठा होण्यास विलंब होत असल्याने नाथ प्रतिष्ठानने रेमडीसीवरच्या रुपात मदतीचा हात दिल्याबद्दल डॉ गित्ते यांनी आभार व्यक्त केले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या वतीने परळी मतदार संघातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना देखील आवश्यकतेनुसार 3000 इंजेक्शन मोफत देण्यात येत आहेत.