बीड — जिल्ह्याचे रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचताच सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आठवडी बाजार, खाजगी कोचिंग क्लासेस, यात्रा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून शतकाच्या उंबरठ्यावर रुग्ण संख्या जाऊन पोहोचली आहे. मृत्यु दरात देखील गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडकपणे राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. सार्वजनिक स्वरूपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात येत आहेत. खाजगी कोचिंग क्लासेस , यात्रा , आठवडी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. शहरी भागात कंटेनमेंट झोनचा निर्णय मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी घेणार आहेत.
महाशिवरात्री उत्सव रद्द-
बीड जिल्ह्यातील परळी हे ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. परळीच्या वैद्यनाथ देवस्थानाने या यात्रेची मोठी तयारी केली होती. मात्र या ठिकाणी होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग पाहता परळी येथील महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे.