Beed News:बीड जिल्हा कारागृह अधीक्षक वाजत गाजत बैलजोडी घेऊन पोहचले मा. न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी
जिल्हा कारागृहातील बैलपोळा;६७ पासूनची परंपरा जोपासली
परळी ता.२३(प्रतिनिधी)Beed District Jail News:बीड जिल्हा कारागृह अधीक्षक वाजत गाजत बैलजोडी घेऊन शुक्रवारी (ता.२२) चक्क येथील मा. जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी पोहोचले हे ऐकणा-यांना आश्चर्य वाटेल परंतु ही जिल्हा कारागृहाची मागील ६७ वर्षा पासूनची एक अखंडित परंपरा आहे.बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा आजही कारागृह अधीक्षक जोपासत आहेत.
बीड जिल्हा कारागृहाची मागील ६७ वर्षांपासूनची एक आगळीवेगळी अनोखी परंपरा आहे.ती आजही तीतक्याच कटाक्षाने सुमारे १९५७ पासून ती पाळली जात असल्याचीही नोंद आहे. पोळा सणाच्या दिवशी कारागृहातील बैलांची मिरवणूक काढून ती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाते, अशी ही परंपरा.त्यानुसार शुक्रवारी (ता. २२) कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी कारागृहातील सर्जा-राजाची मिरवणूक काढून ही परंपरा पाळली.बीड जिल्हा कारागृहात १६ एकर शेती आहे. सोयाबीनसह विविध भाजी पाला पिके घेतली जातात.सर्वत्र यांत्रिकी करण झाले असले तरी कारागृहातील शेती सर्जा व राजा नावाच्या बैलांकडूनच केली जाते. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यां मार्फत शेतीची कामे केली जातात. त्यांना शासन नियमानुसार मोबदलाही मिळतो.
कारागृहातील बैलांनाही वेगळे महत्त्व आहे.पोळ्याच्या दिवशी कारागृहातील बैल जोडीची पूजा करून तिला जिल्हाधिकारी व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या घरी नेले जाते. कारागृहाची उभारणी १९५७ मध्ये झाली.तेंव्हा पासून ही परंपरा सुरू असल्याचे पेट्रस गायकवाड यांनी सांगितले. आज बैलांना स्नान घालून शिंगे रंगविण्यात आली.साज चढविण्यात आला.त्यानंतर पेट्रस गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने ही जोडी प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. तेथे या जोडीची पूजा झाली. त्यानंतर पुन्हा ही जोडी कारागृहात आणण्यात आली.












