प्रज्ञासुर्यास अभिवादनासाठी पूर्णेत भिमसागर उसळला

Spread the love

अश्वारूढ रथ, लेझीम पथक,ढोल ताश्यांनी लक्ष वेधले..

पूर्णा/प्रतिनिधी 

घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी पूर्णेत भीमसागर उसळला होता. आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला मोहित करणाऱ्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भरदुपारी रखरखत्या उन्हात निघालेल्या महारॅलीत आणि शोभायात्रेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.  डॉ. बाबासाहेबांची मुर्ती विराजमान असलेला रथ,लेझीम पथक, विविध जिवंत देखावे साकारण्यात आले तर गाणे आणि बॅण्ड, ढोल- ताशाच्या निनादात तरुणाईने जल्लोष केला. उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे… असे भाव वाजणाऱ्या गाण्यातूनच नव्हे तर प्रत्येकाच्या चेहल्यावर देखील दिसून आले. तरुणाईचा जल्लोष, अबालवृद्धांचा उत्साह आणि महानावाचा जयघोष्यामुळे निळया आसमंतात ‘जय भीम’चा नारा गुंजला.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही म्हणजे तमाम समाज बांधवांसाठी एक पर्वनीच असते. १४ एप्रिल हा दिवस बाबासाहेबांची जयंती म्हणून नव्हे तर सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे एप्रिल महिना उजाडताच सर्वांना या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सभागृहापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो,भंते पय्यावंश जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे, भिक्खूसंघ पय्यावंश,प्रकाश दादा कांबळे, चक्रवर्ती वाघमारे,दादाराव पंडित, अँड.धम्मा जोंधळे, अँड हर्षवर्धन गायकवाड, मनोज उबाळे,केशव जोंधळे, जयंती मंडळाचे पदाधिकारी सदस्य व पंचशील नाट्य ग्रुप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

तत्पुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तहसीलदार माधवराव बोथिकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, डॉ दत्तात्रय वाघमारे, विशाल कदम, संतोष एकलारे, हाजी कुरेशी,जाकीर कुरेशी डॉ समाधान पाटील,पो.नि.विलास गोबाडे आदींनी पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ढोल ताश्यांच्या गजरात  हजारोंच्या अनुयायांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकरनगर येथून निघालेली भव्य मिरवणूक, सिद्धार्थनगर, पंचशीलनगर, कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठेनगर, शिवाजीनगर , सराफा बाजार,छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक मार्गाने मार्गस्थ होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार पुष्पहार अर्पण करून, सामुहिक वंदना घेऊन,मिरवणुकीचा डॉ आंबेडकर चौकात ९ वाजण्याच्या सुमारास समारोप करण्यात आला.मोठ्या जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीत महीलां बाळगोपाळांचा लक्षणीय सहभाग होता.मार्गावर विविध सामाजिक संघटनाच्या  वतीने शितपेय व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले.पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

You cannot copy content of this page