चुडावा पोलीसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला काय..?
हद्दीत गुन्हेगारी फोफावली;वाळू,दारु,गुटखा तस्करीसह चोरी वाटमारीच्या घटना वाढल्या; चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश;चुडावा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पूर्णा / प्रतिनिधी
तालुक्यातील चुडावा पोलीसांनी गुन्हेगारांवर असलेली वचक कमी होत असल्याने हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावली असुन,वाळू,दारु,गुटखा तस्करी देखील वाढली आहे.चोरी वाटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत मात्र पोलिसांना या चोरट्यांचा शोध लावण्यात सपशेल अपयश येत आहे .तीन दिवसांपुर्वी चुडावा ते सातेफळ रस्त्यावर कातरवेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी दुचाकीवरून सातेफळ कडे जाणाऱ्या मायलेकराचा रस्ता अडवून त्यांच्याकडील नगदी ५० हजार रुपये व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतल्याप्रकरणी चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा घडून तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी सुस्तावलेल्या चुडावा पोलीसांना चोरट्यांची ओळख पटवणे तर सोडा साधा थांगपत्ता देखील लावता आला नसल्याने चुडावा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नाचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चुडावा पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी परभणी नांदेड येथून ये-जा करत असल्याने पोलिसांचे अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. पोलीसांच्या सुस्तावलेल्या कार्यपद्धतीमुळे हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील चूडावा पोलिस ठाण्याण्या हद्दीतील कावलगांव, गौर, पांगरा, चुडावा बिट मध्ये वाळू,दारु,गुटखा माफीयांनी अक्षरशः हैदौस घातला आहे.बंदी असलेल्या वाळू व गुटख्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरु आहे.तर दुचाकी चोरी सह चारचाकी,तसेच बैल चोरी, घरफोड्याच्या घटनात लक्षणीय वाढ झाली आहे. घटडलेल्या घटनांतील चोरट्यांचा थांगपत्ता पोलिसांना अद्यापही लागलेला नाही.धनगरटाकळी येथून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनाच्या चोरीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी करून चुडावा पोलीसांना चपराक लावली होती.सुस्तावलेल्या पोलिस यंत्रणेमुळे चोरटे सोकावले आहेत.त्याचा प्रत्यय रविवार दि.६ जानेवारी चुडावा -सातेफळ रस्त्यावर आला. कातरवेळी साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.सातेफळ कडे दुचाकीवरून जाणाऱ्या येथील फिर्यादी रफिक बडेमिय पठाण व त्यांच्या आईस रस्त्यावर आडवून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील ५० हजार रोख व मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. तशी फिर्याद देखील रफिक बडेमिय पठाण या.सातेफळ यांनी चुडावा पोलीसांत दाखल केली आहे.
चुडावा पोलीस ठाण्याच्या ठिसाळ कारभाराचा फटका येथिल नागरिकांना बसतो आहे.परभणी नांदेड येथून येजा करणारे करणा-या कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झाल्याने परिसरात गुन्हेगारीसह अवैध धंदे फोफावत आहे.त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यावर काय उपाययोजना करतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.