श्रीक्षेत्र धनगर टाकळी वैदिक गुरुकुलात योग दिवस साजरा
पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान या वैदिक गुरुकुलात संस्थापक वेदमूर्ती श्री.उमेश महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला.
पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील वैदिक गुरु पिठात एक दिवसीय योग शिबिर आयोजित केले होते या शिबिरासाठी हट्टा येथील SSVP आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रा.डॉक्टर सचिन दरगू हे प्रशिक्षक म्हणून लाभले. आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे गुरुकुलाला आलेल्या निर्देशांप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम, योगासने, इत्यादी शिकवत त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व या 2 तासांच्या शिबिरात सांगण्यात आले. या शिबिरात गुरुकुलातील सर्व विद्यार्थी – अध्यापक वृंदांनी सहभाग घेतला. गुरुकुलाच्या निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या या शिबिरात मुद्दाम सहभागी होण्याकरिता वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या आयुर्वेदिक वैद्यकीय शाखेच्या काही विद्यार्थिनी देखील हौशीने आल्या होत्या. सदर शिबिरासाठी गुरुकुलाचे प्रधानाचार्य वेदमूर्ती डॉ.अवधूत महाराज टाकळीकर, संस्कृत शिक्षक डॉ.जयदीप कोपरेकर, शिक्षिका सौ. सोनल कोपरेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.