जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्या प्रसारणी शाळेच्या रुद्र स्वामीचे यश
पूर्णा ता.३०(प्रतिनिधी);महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेच्या हायस्कूल पूर्णा येथील विद्यार्थी रुद्र अमोल स्वामी याने आपली चमकदार कामगिरी सादर करत विजय मिळवला आहे.रुद्रच्या यशामुळे पूर्णा शहराचा अभिमान वाढला आहे.
या यशामुळे रुद्र स्वामी याची निवड छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.यावेळी खेळाडूचे अभिनंदन करताना तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, पूर्णा क्रीडा संयोजक धरमसिंह बायस, प्रा.सतीश बरकुंटे आणि क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे उपस्थित होते.शाळेच्या वतीने संस्था अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी रुद्र स्वामीचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.