मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ!

Spread the love

मंत्री नरहरी झिरवळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर

मानवत (प्रतिनिधी):
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करून शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवला आहे.हा पक्षप्रवेश कार्यक्रम शनिवारी (दि. ८) परभणी येथे भव्य उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मानवत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉ. अंकुश लाड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचा माहोल निर्माण केला.

पक्षप्रवेशावेळी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये प्रकाश पोरवाल, गिरीश कत्रुवार, बाळासाहेब मोरे, सुरेश काबरा, गणेश कुमावत, मोहन लाड, संजय बांगड, डॉ. राजेश्वर दहे, अँड. किरण बारहाते, राजू खरात, राजेश वासुंबे, कविता धबडगे, अभिषेक अळसपुरे, किशोर लाड, दत्ता चौधरी, विनोद राहाटे, बाजीराव हळनोर, नियामत खान, अ. रहीम अ. करीम, सय्यद जमील, स्वप्निल शिंदे, गणेश उगले आदींचा समावेश आहे. मानवत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शहरातील जनतेत डॉ. लाड यांच्या पुनरागमनाची चर्चा रंगली असून, या प्रवेशानंतर मानवत नगरपरिषद निवडणुकीचा सामना अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


You cannot copy content of this page