Parbhani सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉ. संजय रोडगे
सेलू ता.२२ (प्रतिनिधी)APMC Selu Newsयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. संजय रोडगे यांनी अकरा विरुद्ध सहा अशा मतांच्या फरकाने विजय मिळवत सभापतीपदाची निवड केली. सोमवारी (दि.२२) बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली.
तत्कालीन सभापती चक्रधर पौळ यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी उमेदवारी अर्ज भरणे व छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
डॉ. रोडगे यांना ११ संचालकांनी पाठिंबा दर्शविला. त्यामध्ये अॅड. दत्तराव कदम, अनिल पवार, प्रसाद डासाळकर, अनिता ताठे, वर्षा सोळंके, शैलेश तोष्णीवाल, अनिल बर्डे, रामेश्वर राठी, गोकर्ण पडघन, छाया राऊत यांचा समावेश होता. तर विरोधक नामदेव डख यांना केवळ सहा मते मिळाली.
या विजयाबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे–बोर्डीकर यांनी डॉ. रोडगे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी संदीप तायडे यांनी काम पाहिले.
“शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन सेलू बाजार समिती महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती बनवणे हेच माझे ध्येय आहे,” असे प्रतिपादन नव्याने निवडून आलेले सभापती डॉ. संजय रोडगे यांनी यावेळी केले.












