गोदावरी खवळली.! पाणी पातळीत झपाट्याने वाढ ;परभणी जिल्हाधिकारी चव्हाणांचा सतर्कतेचा ईशारा
गोदावरी धोका पातळी 398.7 मी.च्या थेट उंबरठ्यावर
परभणी, ता. 23(प्रतिनीधी)
जायकवाडी आणि माजलगाव धरणांचे दरवाजे उघडताच गोदावरी नदी अक्षरशः तांडव माजवत आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे पाणीपातळी इशारा मर्यादा 396.47 मी. वर पोहचली असून, धोका पातळी 398.7 मी. च्या थेट उंबरठ्यावर आली आहे. पाण्याचा हा वाढता वेग पाहता नागरिकांनी कसलीही निष्काळजीपणा न करता तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असे कडक इशारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.
परभणी तालुक्यातील सनपुरी गाव शिवारात गोदावरी नदीचे पाणी

पूरस्थिती गंभीर होत असल्याने भारतीय सेनादलाची तुकडी थेट छत्रपती संभाजीनगर येथून रवाना झाली असून, मेजर कमाल यांच्या नेतृत्वाखालील हे पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे. इतकंच नव्हे तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शासनाला एनडीआरएफचे विशेष पथक मागविण्याची मागणी देखील जिल्हा प्रशासनाने केली आहे.दरम्यान, हवामान खात्याने परभणी जिल्ह्यासाठी 23 व 25 सप्टेंबर रोजी “यलो अलर्ट” घोषित केला आहे. जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना, ढालेगाव, तारूगव्हान, मुद्गल, दिग्रस बंधारे तसेच झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी प्रकल्प शंभर टक्के भरले असून त्यातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी, पुर्णा व दुधना नद्या तुडुंब वाहत आहेत.
नागरिकांनी नदीकाठ, पर्यटनस्थळे आणि पाण्याखालून जाणारे रस्ते टाळावेत, अशी पुन्हा एकदा प्रशासनाकडून कडक सूचना करण्यात आली आहे. पोलिस दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून कोणत्याही हालचालीवर काटेकोर नजर ठेवण्यात येत आहे.
अफवांना बळी न पडता नागरिकांनी थेट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष – 02452-226400 / टोल फ्री 1077 किंवा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके (मो. 9975013726 / 7020825668) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.












