परभणीत वन्यजीवप्राणी शिकार करणा-या दोघांना पकडले
१५ किलो मासांसह,काळवीट मादी व निलगायीच्या शिकारीचे पुरावे जप्त; वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची इंद्रायणी माळ परिसरात कारवाई;
परभणी,ता.१८(प्रतिनिधी) अनुसूचित यादीतील संरक्षित वन्य प्राण्यांची अवैधरित्या शिकार करून मांस विक्री करणार्या दोघांनावन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कारवाई करत गजाआड केले असून त्यांचे विरोधात (ता.१८) रोजी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
परभणी तालुक्यातील मांडाखळी परिसरात राणडुक्कर, काळवीट आणि निलगायी यांची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयास प्राप्त झाली होती. या माहितीनुसार गुरुवारी रात्री ९ वाजता इंद्रायणी माळ परिसरात सापळा रचून जगदीपसिंग जीवनसिंग टाक आणि सावणसिंग स्वर्णसिंग टाक या दोघांना अटक करण्यात आली. छाप्यात आरोपींकडून राणडुक्कराचे १५ किलो मांस, तसेच काळवीट मादी व निलगायीच्या शिकारीचे पुरावे जप्त करण्यात आले. आरोपींना रंगेहाथ पकडून त्यांचे जबाब घेण्यात आले असून, त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहायक वनसंरक्षक जी. पी. ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपाल ए. आय. आयनिले, बी. व्ही. सूर्यवंशी, वाय. एम. शिंदे, व्ही. एन. बुचाले, के. एम. थोरे, वनरक्षक आर. डी. खटींग, शिंगारे, डिजी कोल्हेवाड, जी. एम. कुर्हा व शिवाजी शिंदे यांनी केली. या कारवाईदरम्यान पशुधन विकास अधिकारी, पेडगाव येथील डॉ. अब्दुल अजीज यांच्या मदतीने काळवीट मादीच्या शवविच्छेदनात बंदुकीची गोळी आढळून आली आहे. याप्रकरणी वन्य प्राण्यांचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे करीत आहेत.












