शिक्षण माणसाला सर्वोत्तम स्वातंत्र्य बहाल करते-कृषीभुषण कांतरावकाका देशमुख

Spread the love

पूर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पूर्णा ता.१२(प्रतिनिधी).

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचे धाडस प्राप्त होते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवनवीन संकल्पना आत्मसात करून त्या शेती व्यवसायाच्या उपयोगात आणण्यासाठी प्रयत्नरत राहावे असे प्रतिपादन परभणी जिल्ह्यातील कृषीभूषण ‌निसर्गप्रेमी कांतरावकाका देशमुख (झरीकर) यांनी केले.

पूर्णा येथील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात शैक्षणिक वर्षे २०२३-२४ च्या पदवीप्रदान समारंभाचे शनिवारी ता.१२ रोजी आयोजन करण्यात आले होते.यावेळी कृषीभूषण देशमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, प्रसंगी मंचावर जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव, मा.नगराध्यक्ष उत्तमराव कदम, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सदस्य प्रा. डॉ. सुरेखा भोसले व डॉ. विजय भोपाळे,आदी मान्यंवरांची  उपस्थिती होती.पुढे बोलताना कांतराव काका देशमुख म्हणाले की,पदवीचे शिक्षण केवळ नोकरीसाठी नसून पदवी शिक्षणाचा उपयोग माणूस म्हणून जगण्यासाठी व्हावा,पदवी शिक्षणामुळे मिळालेले ज्ञान शेती व्यवसायासाठी उपयोगात आणले तर आपण उत्तम जीवन जगू शकतो. शेतीला विद्यार्थ्यांनी कमी समजू नये आपल्या ज्ञानाच्या जोरावर कृषी क्षेत्रात नवे नवे प्रयोग करून प्रगती करता येते याकडे लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी य वेळी सांगितले.

     याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी आपल्या जीवन अनुभूती तील अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कठीण विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा माणसाला कठोर परिश्रमातून यश संपादन करता येते याचे अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. प्रमुख अतिथी डॉ.विलास पाटील,प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी आपले मनोगत मांडले.पदवी समारंभात कला पदवी व बि. लिब. सायन्स या पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष कुर्‍हे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय कसाब तर आभार प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page