हिंदी भाषाच ही ज्ञानपरंपरेचा स्त्रोत -प्रा. डॉ. कसाब यांचे प्रतिपादन
पूर्णा ता.२२(प्रतिनिधी) – “हिंदी भाषा ही भारतीय ज्ञानपरंपरेचा स्रोत असून आज जगातील सर्व प्रमुख भाषेतील ज्ञान हिंदीत उपलब्ध आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय कसाब यांनी केले.ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा येथील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी पखवाडा विशेष व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रा. कसाब म्हणाले की, प्राचीन काळी ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली नसल्याने अनेक समाजघटक वंचित राहिले. परंतु स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळाल्याने इंग्रजीबरोबरच हिंदीही व्यवहारज्ञानाचे प्रभावी माध्यम ठरली. आज देशभर हिंदीला मिळणारा स्वीकार हा तिच्या उंच भरारीचा पुरावा असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. भीमराव मानकरे यांनी “राजकीय उदासीनतेमुळे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळत नाही, ही भारतीयांसाठी शोकांतिका आहे. मात्र हिंदी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात असल्यानेच ती खरी जनभाषा ठरते,” असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी “प्रत्येक भाषेतील ज्ञानाचे कण वेचून आपण समृद्ध व्हायला हवे. साहित्य हा समाजाचा आरसा असल्याने वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे,” असे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘बीजक’ भित्तिपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी मानले.या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











