गुटख्याची तस्करी करताना घोरबांड स्था.गु. शाखे कडून जेरबंद

Spread the love

गुटखा तस्करी करताना दुचाकीसह रंगेहात पकडले;५८ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

पूर्णा( प्रतिनिधी) ५ एप्रिल

दुचाकी वरून तस्करी करीता गुटखा घेऊन जाणाऱ्या घोरबांड नामक एका गुटखा तस्कराला स्थानिक गुन्हा शाखा व पूर्णा पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाईत दुचाकीसह रंगेहात पकडल्याची घटना शनिवार ता.५ एप्रिल रोजी घडली आहे. संबंधितांकडून पोलिसांनी घटनास्थळांवरून ५८ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकांत तीघां विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पूर्णा तालुक्यात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुडघ्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती परभणी पोलीस दलाला मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि. विवेकानंद पाटील, तसेच पूर्णा पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंदनसिंह परिहार पो.हे.काॅ. सचिन भदरगे,पो.काॅ. हनुमान ढगे, बीट जमादार श्याम काळे, यांच्या संयुक्त पथकाने शनिवार ता.५ रोजी पहाटे पासूनच झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर सापळा रचला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कातनेश्वर शिवारातून जाणाऱ्या कॅनल रस्त्याने तालुक्यातील एरंडेश्वर येथील मारुती घोरबांड नामक गुटखा तस्कर आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर एम.एच.२२/ए.एफ. १३८४ दुचाकीवरून एका पिशवीमध्ये प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असताना पोलिसांच्या पथकाने त्यास रंगीहात पकडले. त्याच्याकडून राजनिवास नामक आठ हजार आठशे रुपये किमतीचा गुटखा पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी असा ५८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून त्यास ताब्यात घेत जेरबंद केले आहे. त्याचे विरोधात पूर्णा पोलिस स्टेशनमध्ये दुपारी स्था.गु.शाखेचे पोहेकाॅ. रंगनाथ दुधाटे यांची फिर्यादीवरून मारुती कुंडलिकराव घोरबांड, रा. एरंडेश्वर तालुका पुर्णा व त्यास गुटखा पुरवठा करणारे अन्य दोन तस्करांविरोधा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास फौजदार श्रीनिवास पडलवार हे करत आहेत.

You cannot copy content of this page