अतिवृष्टीच्या पावसाने पुर्णा तालुक्याला झोडपले;ओढे,नदीनाले ओव्हरफ्लो ,जनजीवन विस्कळीत, हजारों हेक्टरवरील पिकं पाण्याखाली

Spread the love

पूर्णा ता.१२ (प्रतिनिधी) – गेल्या महिनाभरापासून पुर्णा तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाच दुपारी एकच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत संततधार सुरूच राहिली. या अवकाळी पावसामुळे पुर्णा शहरासह तालुक्यातील जवळपास ३० ते ४० गावे अक्षरशः जलमय झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.पुर्णा तालुका व शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, वाहतूक ठप्प झाली, घरांमध्ये व शेतशिवारात पाणी साचले, तसेच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ढगफुटीसदृश्य पावसाचा फटका

तालुक्यातील पिंपळा लोखंडे परिसरात सुरुवातीसच एक ते दीड तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे गावातील रस्ते, शिवार सर्वत्र पाण्याखाली गेले. त्यानंतर कानडखेड, अजदापुर, खुजडा, बळीराजा साखर कारखाना परिसर, फुकटगाव, कान्हेगाव, ममदापूर, गणपूर, सुकी, हटकरवाडी, कात्नेश्वर, ताडकळस, कावलगाव, चुडावा, लिमला, वझुर या महसूल मंडळातील सर्व गावे पावसाच्या तडाख्यात सापडली. सलग चार तास पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

नदी-नाल्यांना पूर

पूराचे पाणी ओसंडून वाहिल्याने पूर्णा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली. आहेरवाडी–माटेगाव परिसरात पाऊस सर्वाधिक झाल्याने नदी-पात्रे भरून वाहू लागली. परिणामी पूर्णा–झिरो फाटा राज्य रस्ता, आहेरवाडी–पूर्णा मार्ग तसेच पूर्णा–पांगरा रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागले.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पावसामुळे शेतशिवारात ५ ते ७ फूट पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली. विशेषतःकानडखेड, अजदापुर ,गौर, धनगर टाकळी पुर्णा व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी सातपर्यंत पावसाची संततधार कायम होती.

: जीवावर बेतलेला प्रसंग पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवलं ..!

फुकटगाव परिसरात पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून एका इसमाचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता गावातील सुमारे ४० वर्षीय इसमाने नदी पार करण्याचा प्रयत्न केला असता तो पुराच्या पाण्यात अडकला. मात्र, ग्रामस्थ व बळीराजा साखर कारखान्याचे कर्मचारी अंगद बोकारे यांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.

शहर जलमय –ऐनवेळी नाल्यांमुळे तुंबल्याने झाली गैरसोय

पूर्णा शहरात दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे महावीर नगर, मस्तानपुरा, गवळी गल्ली, डोबीमोहल्ला, हरिनगर, विजयनगर, कोळीवाडा, भिमनगर अशा सखल भागात दहा फूट पाणी साचले. मुख्य रस्त्यालगतच्या नाल्या तुंबल्याने रस्त्यावर पाणी ओसंडून वाहिले. प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. परिस्थिती हाताळण्यासाठी नगरपालिका स्वच्छता विभागाचे निरीक्षक पारवे व १०-१५ कर्मचारी रात्री उशिरापर्यंत नाले मोकळे करताना दिसून आले..

You cannot copy content of this page