ताडकळस येथिल जि.प.शाळेला २०० आनंदी वाचन पेटींची भेट
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एचएआरसी संस्थेचा उपक्रम
पूर्णा(प्रतिनिधी)
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील ३ जिल्हा परिषद शाळेला तब्बल २०० आनंदी वाचन पेटींची भेट दिली आहे.
ताडकळस येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत एचएआरसी संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार भाग्यवंत तर प्रमुख अतिथी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक,ताडकळस केंद्राचे केंद्रप्रमुख राम जाधव,आदर्श शिक्षक संतोष रत्नपारखे, मारुती डोईफोडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालासाहेब गंगाकात्रे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती डोईफोडे यांनी केले.डॉ.पवन चांडक यांनी मनोगत व्यक्त करतांना “ज्ञानाने समृद्ध होण्यासाठी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीचा प्रत्येकाने फायदा करून घेऊन आपला विकास साधला पाहिजे. इतिहासाकडे वळून पाहिले तर आपणाला अनेक महामानव दिसून येतात. या महामानवांनी पुस्तकांचा योग्य वापर केला आणि स्वतःसह इतरांचाही विकास घडवून आणल्याचं आपल्याला दिसून येतं. वाचनामुळे प्रत्येक जण आपली प्रगती करू शकतो म्हणून अन्ना इतकेच वाचनाकडेही आपण लक्ष दिले पाहिजे.असे सांगितले.
एचएआरसी संस्थे तर्फे जि. प. कन्या शाळा ताडकळस शाळेला ८० पुस्तकांची, जि. प. प्रशाला ताडकळस शाळेला ६० पुस्तकांची तर जि.प.प्राथमिक ताडकळस शाळेला ६० पुस्तकांची असे तिन्ही शाळेची मिळून एकूण २०० पुस्तकांची वाचनपेटी भेट देण्यात आली.या वाचन पेटीमध्ये पुस्तकांचा खजिना असून यात कथा व कविता संग्रह, महापुरुषांची,शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध असून मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन सारिका गिरी यांनी तर आभार प्रदर्शन आनंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी भगवान फुलसावंगे, भद्रया स्वामी, संजय सोनकांबळे, अपर्णा पंडित, अर्चना पुणेकर, शेख राशिद आदी उपस्थित होते.











