ज्वेलर्सचे दुकान फोडले ५ लाखांचा ऐवज पळवला
परभणी शहरातील गजबजलेल्या गांधी पार्क येथील घटना;चोरट्यांचे पोलीसांना आवहान ; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
परभणी ता.२७/(प्रतिनिधी)
शहरातील नानलपेठ पोलिसांच्या हद्दीतील गजबजलेल्या गांधी पार्क बाजारपेठ परिसरातील एका सराफा ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना. शुक्रवार ता. २७ जून रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.ऐन बाजारपेठेतील दुकानास चोरट्यांनी लक्ष बनवल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या गांधी पार्क परिसरातील बाजारपेठेतील गणेश ज्वेलर्सचे मालक शुभम कांकरीया यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानामधून ४ लाख ७७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे समजते.. दोन चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्यातही कैद झाले आहेत. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. विवेकानंद पाटील, नानलपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलिस निरिक्षक मारोती कारवार यांनी घटनास्थळी भेट दिली. नानलपेठ पोलिसात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक आर.के. राठोड यांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक मारोती कारवार करत आहेत. दरम्यान चोरट्यांनी या भागात आणखी एक दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.