Latur:’सरकारने OBCसमाजाचा घात केला’,चिठ्ठी लिहून तरुणाची नदीत उडी घेऊन आत्महत्या.!

Spread the love

लातूर ता.११(प्रतिनिधी)OBC Reservation Newsलातूर शहर हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी समाजातील भरत कराड या तरुणाने सरकारवर अन्यायाचा आरोप करत आयुष्य संपवले. लातूरच्या मांजरा नदीत उडी मारून त्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कराडने सरकारवर गंभीर आरोप केले असून, “सरकारने आमच्या समाजाचा घात केला” असा थेट उल्लेख त्यात आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

भरत कराडने आपल्या चिठ्ठीत ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल संताप व्यक्त केला आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसींचे आरक्षण संपल्याची भावना त्याने व्यक्त केली. “आमच्या समाजाला न्याय मिळाला नाही, सरकारने आमच्या भवितव्यावर घाला घातला,” असे शब्द त्याच्या चिठ्ठीत लिहिलेले आढळले.

घटनेमुळे समाजात संताप

भरतच्या या टोकाच्या पावलामुळे लातूरसह संपूर्ण प्रदेशात खळबळ उडाली आहे. ओबीसी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. अनेकांनी शासनाच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करत ओबीसी समाजाचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मांजरा नदीतून भरतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

समाजाच्या मागण्या तीव्र

भरत कराडच्या मृत्यूमुळे ओबीसी समाजातील भावना ढवळून निघाल्या आहेत. “आमच्या हक्काच्या आरक्षणावर कुठलाही घाला मान्य नाही,” असे म्हणत ओबीसी नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शासनाने न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे ओबीसी आरक्षण प्रश्न पुन्हा पेटला असून, राज्य सरकारसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

You cannot copy content of this page