२१ रोजी पालीका निवडणुकीची मतमोजणी;पुर्णेत राजकीय वातावरण तापले!

Spread the love

पुर्णा,ता.८(प्रतिनिधी) आरोप प्रत्यारोप,अटी तटीच्या लढती, दिग्गजांच्या प्रतिष्ठा, कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत ता.२ डिसेंबर रोजी पुर्णा पालीकेच्या २३ जागांपैकी २१ सदस्य व १ नगराध्यक्ष जागेची निवडणूक पार पडली.त्या दिवसानंतर मतपेट्यांमध्ये बंद झालेले उमेदवारांचे भवितव्य आता रविवार, दि.२१ रोजी उघड होणार आहे. निकालाच्या क्षण-जवळ येत असतानाच संपूर्ण पुर्णा शहरासह तालुक्यात जोरदार राजकीय हालचालींना वेग आला असून नागरिकां मध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.पुर्णा शहरात पालीका निवडणुकीसाठी ११ प्रभागासह १ नगराध्यक्ष पदांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली.यानंतर आता शहरात चर्चा रंगताना दिसून येत आहेत. चहा टपऱ्या, चौक, गल्लीबोळ, बाजारपेठा सध्या “कोण जिंकणार?” या एकाच प्रश्नाने गजबजलेल्या आहेत.

निवडणुकीदरम्यान प्रचारात उतरलेली सर्वच दिग्गज मंडळी आता शांत असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर प्रतीक्षेची अधीरता स्पष्टपणे जाणवत आहे.दरम्यान प्रभाग क्रमांक १० व १ मध्ये दोन जागांवरील उमेदवारांचे आक्षेप असल्याने त्यांची मतदान प्रक्रिया २० रोजी पार पडणार आहे.येथिल तहसील कार्यालयात २१ डिसेंबर रोजी सर्व जागांसाठी झालेल्या मतदानाचीमतमोजणी प्रक्रिया ७ टेबलांवर होणार आहे असुन, तहसील कार्यालयात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे .प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी माधवराव बोथिकर यांनी दिली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस दल सज्ज ठेवण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात झाली आहे.शहरवासीयांसाठी आगामी रविवार हा केवळ निकालाचा दिवस नसून पुर्णेच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सत्ता बदल होणार की विद्यमान नेतृत्व पुन्हा विश्वासार्ह ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील राजकीय भविष्य आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.

You cannot copy content of this page