नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला!२ डिसेंबरला मतदान; फक्त ऑनलाईन अर्ज, ‘डबल स्टार’ मतदारांना मतदानास बंदी
मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) :
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये दहा नव्या नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असून, त्यापैकी १५ नगरपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. या निवडणुकांमधून एकूण ६८५९ नगरसेवक आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे.
या वेळेस निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) द्वारे पार पडणार आहेत. उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
अर्ज दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक राहील. मतदार यादीत दुबार नाव आढळल्यास अशा मतदारांना ‘डबल स्टार’ चिन्ह दिले जाणार आहे. अशा मतदारांना फक्त एका ठिकाणीच मतदानाचा अधिकार राहील.
या निवडणुका बहुसदस्य प्रभाग पद्धतीने पार पडणार असून, एका प्रभागात दोन ते तीन जागा असतील. राज्यात १ कोटी ७ लाख ३० हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येईल.प्रत्येक उमेदवारासाठी २ लाख रुपयांपर्यंत खर्च मर्यादा लागू राहणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम:
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ – १० नोव्हेंबर २०२५
- अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०२५
- मतदानाची तारीख – २ डिसेंबर २०२५
- मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
राजकीय वातावरण तापणार
या घोषणेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. नगरपरिषद निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासंतुलन ठरविणाऱ्या ठरणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात राजकीय रणसंग्राम तापणार आहे.












