मुख्यमंत्र्यांसोबत महादेव कोळी समाज शिष्टमंडळाची बैठक आयोजित करु-पालकमंत्री मेघना बोर्डीकर
समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर परभणीत पार पडला कोळी महादेव व कोळी मल्हार समाजाचा जागृती मेळावा
परभणी,ता.12(प्रतिनिधी) : मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार यांच्या समस्या आमच्या लक्षात आल्या आहेत, त्या समस्या सोडविण्या साठी आम्ही तत्पर आहोत. त्यासाठी मराठवाड्यातील कोळी महादेव समाजातील शिष्टमंडळाची बैठक लवकरच(Parbhani State Minister Meghana Bordikar News)मुख्यमंत्री यांच्यासोबत आयोजित करणार आहोत, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.
बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ व आदिम विकास परिषद महाराष्ट्र राज्य शाखा परभणीच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोळी महादेव समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ व समाज जागृती मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री सौ. साकोरे – बोर्डीकर तर उद्घाटक म्हणून परभणी भाजपा लोकसभा समन्वयक डॉ. केदार कटिंग, आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, परभणी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री सुरेशराव भुमरे, परभणी भाजपा महानगराध्यक्ष श्री शिवाजी भरोसे, समाजाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती रेखडगेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यातील बालाघाट महादेव डोंगर रांगा या कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीचे मूळ वस्तीस्थान आहे आणि याचे संदर्भ ब्रिटिश कालीन अहमदनगर 1881 ठाणे 1882 गॅझेट मध्ये आढळतात. कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या जुन्या नोंदी सर्वत्र तत्कालीन कायद्यानुसार कोळी झाल्याच्या आणि जात पडताळणी समितीकडून होणारा अन्याय या बाबतीत सविस्तर विश्लेषण प्रास्ताविकात श्री रमेश पिठ्ठलवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. केदार खटिंग यांनी केले. त्यांनी मनोगत व्यक्त करताना परभणी जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या उन्नतीसाठी मी नेहमी प्रयत्न करत आहे आणि मी या समाजासोबत आहे, असे ते म्हणाले. यावेळी आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाशजी कोळी म्हणाले की, कोळी महादेव समाजातील युवक शिकत आहेत, संघटन होत आहे पण जात वैधता प्रमाणपत्रसाठी अडचणी आणल्या जात असल्यामुळे समाजात बेरोजगारी वाढत आहे.
आदिवासी दिनानिमित्त कोळी महादेव समाजातील गुणवंत विद्यार्थी नवनियुक्त कर्मचारी, अधिकारी समाजभूषण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश मारेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन निवृत्ती रेखडगेवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेशराव सूर्यवंशी, अच्युतराव सोगे, रोहिदास एम्बलवाड, अंबादास रेडेवाड, मुरलीधर भंडारवाड, ओम मुदीराज, अॅड. राजू पिठले, सुनिल पुटेवाड, चंद्रकात बुधवारे, ज्ञानेश्वर सुरवसे, विकास कांबळे यांच्यासह समाज बांधवांनी प्रयत्न केले.












