मराठवाड्यावर वरुणराजा कोपला.! पुराच्या तडाख्यात ; ८ जणांचा मृत्यू, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

Spread the love

बीड(प्रतिनिधी)२३ सप्टेंबर
दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा यंदा प्रचंड पावसाने अक्षरशः बुडाला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला असून शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी घरात चिखल, जनावरांचे मृत्यू, शेतकऱ्यांचे पिके जमीनदोस्त आणि महिलांचा आक्रोश अशी हृदयद्रावक परिस्थिती आहे.

गेल्या दोन दिवसांत धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जायकवाडी आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, काही भागात लष्कर आणि NDRF च्या पथकांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

पावसाचे आकडे धक्कादायक

१ जूनपासून आजवर मराठवाड्यात १२४ टक्के सरासरी पाऊस झाला आहे. साधारणपणे २२ सप्टेंबरपर्यंत ६०४ मिमी पाऊस अपेक्षित असतो, मात्र यंदा तो ७४७ मिमी वर पोहोचला आहे. फक्त सप्टेंबर महिन्यातील पावसाने तर १६५ टक्के आकडा गाठला आहे.

लातूर : महिलांचा आक्रोश

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील महिलांनी हाताशी आलेले पीक पाण्यात गेले म्हणून आर्त टाहो फोडला. “शासन मदत करीत नाही, वाचवा, वाचवा” असा हंबरडा फोडल्याने वातावरण हळहळून गेले. बैल, कोंबड्या वाहून गेल्या असून अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

धाराशिव : घरात चिखल, संसार उद्ध्वस्त

धाराशिवच्या आंबी गावात पूरपाणी घरात शिरल्याने नागरिक बेघर झाले आहेत. घरात सर्वत्र चिखल आणि उद्ध्वस्त झालेले संसार अशी चित्रं पाहायला मिळाली. भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.

जालना : ऊस व सोयाबीन पाण्याखाली

जालन्यातील दुधना काळेगाव परिसरात ऊस, सोयाबीन, कपाशी, मका ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी प्रकाश भांदरगे यांचा दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला आहे.

बीड : गावे वेढली, संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात सिंदफणा नदी दुथडी भरून वाहत असून शिरसमार्ग गाव पूर्णपणे वेढले गेले आहे. नागरिकांना NDRF च्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. परळी तालुक्यातील पोहनेर गावाचा संपर्क तुटला असून चप्पूच्या साहाय्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आलं.

परभणी : ४० गावे वेढली, ५७५ जणांचे स्थलांतर

परभणी जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना नद्यांना पूर आला असून तब्बल ४० गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत ५७५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक पुलं पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

हिंगोली : हळद, सोयाबीनचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीच्या बॅक वॉटरमुळे हजारो हेक्टर शेती तळ्यात रूपांतरित झाली आहे. सोयाबीन, कापूस, हळद ही पिकं उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत.

मदतकार्य सुरू – नेत्यांची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ३१ लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा जीआर काढण्यात आला असून “ओला दुष्काळ जाहीर करा” या प्रश्नाला टाळून सर्वांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागात तातडीने जाण्याचे आदेश दिले आहेत.

खासदारांचा धाडसी बचावकार्य

धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पाण्यात उतरले. अडकलेल्या आजी-नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी थेट बचाव कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठवाड्यातील हा महापूर शेतकरी, जनावरे आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोठं संकट ठरत असून शासन आणि प्रशासन यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.


You cannot copy content of this page