मातोश्री पांदण रस्त्याचे काम निकृष्टच आता कारवाईकडे लक्ष
पूर्णा तालुक्यातील सोनखेड पांढरी ग्रामपंचायतीचा प्रताप;कार्यवाहीची प्रतिक्षा
—————
पूर्णा(प्रतिनिधी)
मातोश्री पांदण योजनेअंतर्गत रोहयोमधून करण्यात आलेले दोन किमी रस्त्याचे मजबुती करणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे अधीका-यांनी केलेल्या तपासणीअंती उघडकीस आले असून,सुमार दर्जाचे काम करणाऱ्या पूर्णा तालुक्यातील सोनखेड पांढरी ग्रामपंचायतीवर आता काय कार्यवाही केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.
पूर्णा तालुक्यातील सोनखेड पांढरी ग्रामपंचायती अंतर्गत दोन किमी रस्त्याचे काम मातोश्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत रोहीयोच्या माध्यमातून करण्यात आले होते.सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ओमकार मधूकर देसाई यासह काही नागरिकांनी पं.स.पूर्णा कडे अनेक वेळा केली होती.परंतू, पंचायत समिती कार्यालयातील रोहयो विभागाचे अधिकारी कर्मचारी संबंधित ग्रामपंचायत सरपंचास पाठीशी घालून चौकशी करीत नव्हते.असे असताना तक्रारदाराच्या रेट्यामुळे अखेर ता.२८ मे बुधवार रोजी पूर्णा पंचायत समितीतील रोहयो कक्षातील सा.कार्यक्रम अधिकारी माधव कदम,तां.सा अ एस एम बहिर व अन्य एक कर्मचारी यांनी सदर रस्ता खोदून कामाची क्वालिटी तपासली.त्यात सदरील रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण नसल्याचे निर्दशनास आले.या कामासाठी दोन रोजगार मस्टर निघाले असून २ लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.उर्वरीत शिल्लक काम सबंधीत ग्रामपंचायत ते काम करुन घेईल आणि त्यानंतरच बाकी निधी अदा होईल.अशी ग्वाही सा.कार्यक्रम अधिकारी कदम यांनी दिली.रस्ता काम तपासणी चौकशी वेळी तक्रारदारासह ग्रा.पं सदस व ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
कारवाई होणार का ..?
पूर्णा तालुक्यातील सोनखेड पांढरी ग्रामपंचायती अंतर्गत मातोश्री पांदण रस्त्याचे लाखों रुपये खर्च करून शासनाने रोहीयो मधून दोन किमीचे मजबुतीकरण करण्यात आले.मात्र काम करणाऱ्या ग्रामपंचायतीं शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत थातूरमातूर काम केले आहे.त्यामुळे रस्ता कामात कुचराई करणाऱ्या ग्रामपंचायत,तसेच रोहीयोच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.