Special Trainमुंबई-करीमनगर सहा फेर्यात धावणार..!
दिवाळी व छटपूजेनिमित्त मराठवाडा प्रवाशांना दिलासा
पूर्णा, ता.१३(प्रतिनिधी) : दिवाळी आणि छटपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा दिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते करीमनगर या दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्यांच्या फेर्या मंजूर करण्यात आल्या असून, 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत या गाड्या धावणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली.
गाडी क्रमांक 01067 लोकमान्य टिळक टर्मिनस – करीमनगर ही विशेष रेल्वे 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान दर मंगळवारी दुपारी 3.30 वाजता मुंबईहून सुटेल. ठाणे, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड मार्गे ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करीमनगरला पोहोचेल.
तर गाडी क्रमांक 01068 करीमनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष सेवा 24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान दर बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता करीमनगरहून सुटेल. नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद मार्गे ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 1.40 वाजता मुंबईत पोहोचेल.
या विशेष गाडीत वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य अशा मिळून 22 डब्यांचा समावेश असेल. विशेष रेल्वेच्या मंजुरीमुळे मराठवाडा व परिसरातील प्रवाशांना उत्सव काळात प्रवासासाठी मोठा फायदा होणार आहे.












