हायटेक निवासी शाळेचे मुजोर संस्थाचालक पती पत्नी फरार
झिरोफाटा येथील प्रकरण;शैक्षणिक शुल्कासाठी घेतला होता पालकाचा बळी
पूर्णा ता.१२ (प्रतिनिधी)
पेशाने किर्तनकार असलेल्या परभणी तालुक्यातील मौजे उखळद येथिल जगन्नाथ हेंडगे नामक पालकाचा झिरोफाटा येथिल बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत संस्थाचालक पती पत्नीने केलेल्या जबर मारहाणीत ता.१० रोजी गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना घडली होती.घटना घडल्यानंतर मुजोर संस्थाचालक आपल्या पत्नीसह फरार झाला आहे. पोलीसांनी त्याला पकडण्यासाठी ३ पथकं स्थापन केली असूनही तो पोलीसांना गुंगारा देत आहे.
राज्यात आजही अनेक शैक्षणिक संस्थाचालकांकडून पालकांचा छळ सुरु असल्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांची टीसी मागितली तर उर्वरीत फी भरेपर्यंत टीसी दिली जात नाहीत्यात मग दादागिरी केली जाते ,मारहाण होते. असाच प्रकार परभणीत घडला आहे.उखळद ता.जि.परभणी येथिल जगन्नाथ हेंडगे नामक ४२ वर्षीय वारकरी संप्रदायाचा पालक गुरुवारी आपल्या चुलत्यासह मुलीची टीसी काढण्यासाठी झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत गेले होते .यावेळी उर्वरित फीससाठी चक्क संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला.पसार संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी यांच्या शोधासाठी पोलीसांचे तीन पथकं रवाना केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मयत जगन्नाथ हेंडगेच्या कुटुंबाची मागणी…… अतिशय मनमिळाऊ आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा हाथी घेवून सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते. त्यामुळे त्यांना महाराजही बोलले जायचे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा आहे. जगन्नाथ हेंडगे यांचा केवळ फिससाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला आहे. यातील दोषी संस्थाचालकाला सरकारने सोडू नये, त्यांचा संस्था कायमस्वरूपी बंद करून,त्याच्या संपत्तीची चौकशी करावी,त्यास पकडून फासावर लटकावे अशी मागणी कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी केली आहे.
पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून काम करावे किर्तनकार पालक जगन्नाथ हेंडगे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हायटेक निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी हे दोघे राजकीय व्यक्ती असल्यामुळे या प्रकरणांमध्ये पोलीसांना निश्चितच राजकीय दबाव येणार असल्याचे बोलले जात आहे.सध्या प्रथमतः दोघेच आरोपी आहेत. परंतू, इतर काही जण यात समाविष्ट आहेत का? याचा तपास पोलीसांना करावा लागणार आहे.तसेच यात कोणतीही दिरंगाई होऊ नये प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे.












