परभणीत भरदिवसा अँटोचालकाचा खुन

Spread the love

नांदखेडा रस्त्यावरील घटना;हत्येने एकच खळबळ

परभणी,ता.१४(प्रतिनिधी);
शहरातील नांदखेडा रस्त्यावरील सोमनाथनगर परिसरात भरदिवसा एका ऑटोचालकाची हत्या झाल्याचे पुढे येताच एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी (दि. १४) दुपारी येथील नांदखेडा रस्त्यावरील सोमनाथनगर परिसरात एक मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याची माहिती नानलपेठ पोलिसांना मिळाली. यावरून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव सय्यद अकबर सय्यद गफूर (अंदाजे वय ४०) रा. पाकीजा मोहल्ला जिंतूर रस्ता परभणी असे असल्याचे पुढे आले आहे. सय्यद अकबर हे ऑटोचालक असल्याचीही मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनेची माहिती काही वेळातच शहरभर पसरल्याने शासकीय रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र ऑटोचालक सय्यद अकबर यांची हत्या का व कुणी केली ? तसेच कोणत्या कारणाने केली ? हे अद्याप उलगडले नाही. या प्रकरणी नानलपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने तपास हाती घेण्यात आला असून मारेकऱ्यास शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहेत.दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे शहरात तर्क – वितर्काला उधाण आले आहे.

You cannot copy content of this page