परभणीत पंचायत समिती सभापती पदांवर महिलांचे वर्चस्व — ९ पैकी ५ महिला होणार विराजमान
आरक्षण सोडतीत महिला नेतृत्वाचे बळकटीकरण स्पष्ट
परभणी ता.१० / प्रतिनिधी :
परभणी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.१० ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली.सोडतीच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार, तहसीलदार रामदास कोलगणे, नायब तहसीलदार अपर्णा दुधारे व सहाय्यक महसूल अधिकारी त्रिंबक बहुरे उपस्थित होते.
सोडतीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार —
▪️ परभणी, गंगाखेड आणि सेलू पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली राहिली आहेत.
▪️ पालम, मानवत आणि जिंतूर पंचायत समित्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत.
▪️ सोनपेठ पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे,
तर पाथरी पंचायत समिती नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी राखीव ठरली आहे.
▪️ पूर्णा पंचायत समितीचे सभापती पद नागरीकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) यासाठी निश्चित झाले आहे.
अशा प्रकारे एकूण नऊ पंचायत समित्यांपैकी पाच ठिकाणी महिला सभापती विराजमान होणार आहेत. त्यात तीन सर्वसाधारण व दोन मागास प्रवर्गातील महिला आहेत. उर्वरित चार पदांपैकी तीन सर्वसाधारण पुरुषांसाठी तर एक मागास प्रवर्ग पुरुषासाठी राहिले आहे.या सोडतीतून महिला नेतृत्वाला मिळालेली संधी लक्षवेधी ठरत असून, आगामी काळात पंचायत समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण प्रशासनात महिलांचे वर्चस्व अधिक दृढ होईल.











