Parbhani सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी; जायकवाडी,खडकपुर्णा, येलदरी धरणांतून विसर्ग वाढला..

Spread the love

पुर्णा,पालम, गंगाखेड, सोनपेठ,पाथरी तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान;नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

परभणी, दि. २८ सप्टेंबर (प्रतिनिधी): सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.दुस-यादीवशीही नऊ महसूल मंडळांत पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली असून संततधार पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत.पुर्णा,पालम, गंगाखेड, सोनपेठ,पाथरी तालुक्यात शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पुन्हा एकदा जायकवाडी,खडकपुर्णा,येलदरी,दुधना धरणांच्या क्षेत्रात वाढलेल्या पाणलोटामुळे पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.त्यामुळे परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे.नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण यांनी केले आहे.

🔹 खडकपूर्णा व येलदरी धरणातील विसर्ग

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून तब्बल ७७,००० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर येलदरी धरणातून आज दुपारी २ वाजता विसर्ग वाढविण्यात आला. येलदरी जलाशयाचे १, १०, ५ आणि ६ क्रमांकाचे एकूण चार दरवाजे ०.५ मीटरने उचलून ८,४३९.८८ क्युसेक पाणी पूर्णा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे येलदरीखालील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

🔹 जायकवाडी प्रकल्पातील विसर्ग

नाथसागर (जायकवाडी) जलाशयातून आज सकाळी १०.१३ ते ११.०० या वेळेत १८ नियमित गेट ५.५ फूट पर्यंत उघडण्यात आले. त्यातून ९,४३२ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे १८ नियमित व ९ आपत्कालीन गेटमधून एकूण १,४१,४८० क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. आवक पाहून विसर्गात वाढ-घट होणार असल्याचे पैठण येथील पूर नियंत्रण कक्षाने सांगितले.

🔹 परभणी जिल्ह्यातील पावसाची नोंद (२८ सप्टेंबर अहवाल)

  • गंगाखेड : माखणी – ७४.८, राणीसावरगाव – ६६
  • पूर्णा : पूर्णा – ६९.५, चुडावा – ७३, कावलगाव – ६६
  • पालम : पालम – ८१.३, चाटोरी – ६६, बनवस – ६७.३, पेठशिवनी – १२६.३

(२७ सप्टेंबर अहवाल)

  • परभणी तालुका : दैठणा – ७९.००, पिंगळी – ६५.८, परभणी ग्रामीण – ६५.८
  • गंगाखेड तालुका : गंगाखेड – १०६.३, महादपुरी – ९१.५, माखणी – ८२.३, राणीसावरगाव – १४३, पिंपळदरी – १११.३
  • पूर्णा तालुका : पूर्णा – ७५, ताडकळस – ९७.८, लिमला – ७७, कातनेश्वर – ६७.५, चुडावा – ८५.८, कावलगाव – ९९.८
  • पालम तालुका : पालम – १५३.३, चाटोरी – १४३, बनवस – १३९.८, पेटशिवनी – १११.५, रावराजुर – ११३.०
  • सोनपेठ तालुका : आवलगाव – ६५.८, वडगाव – ७६

🔹 परिस्थिती गंभीर

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक शेतशिवार पाण्याखाली गेले असून कापणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. घरांची पडझड, जनावरांची हानी, रस्ते बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page