मा.आ.बाबाजानी दुर्राणी काँग्रेसचे नवे प्र. जिल्हाध्यक्ष
प्रदेशाध्ययक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले नियुक्ती पत्र
परभणी,ता.२८(प्रतिनिधी)
परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मंगळवारी(दि. २८)नियुक्तीचे पत्र बाबाजानी यांना सोपवले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या नियुक्तीमुळे एकदाचा काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाला मुहूर्त लागला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाकडे जिल्हाध्यक्ष पदाची घोंगडे भिजत राहिले होते. माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे कोणाकडे सोपवायची याबाबत गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षात चर्चा सुरू होती. या संदर्भात अनेक नावे चर्चिली जात होती. सुरुवातीला काही नव्या नावांची चर्चा झाली. बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी ही चर्चा होती. तथापि पक्षातल्या एका गटाने या संभाव्य नियुक्तीत अडसर निर्माण केला. माजी खासदार तुकाराम रेंगे हेही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. शेवटच्या टप्प्यात बाबाजानी की तुकाराम रेंगे असाही तिढा पक्षासमोर निर्माण झाला. अखेर पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभारी जिल्हाध्यक्षपदी बाबाजानी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे एकदाचा या विषयावर पडदा पडला आहे.












