व्यापार्यास मारहाण करून १४ लाख ५० हजारांची बॅग पळवली
दैठणा पोलीस अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल
परभणी/प्रतिनिधी
परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील बोरवंड शिवारात मुख्य रस्त्यालगत बुधवारी (दि.5) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजराजेश्वर जिनींगसमोर व्यापार्याच्या तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून त्याच्याजवळील 14 लाख 50 हजार रुपये ठेवलेली बॅग हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आली. घटनास्थळी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, दैठणा ठाण्याचे सपोनि अशोक जायभाये यांनी भेट दिली.
याबाबत जिनींग मालक रामनिवास शर्मा (रा.रंगनाथ नगर, नांदखेडा रोड, परभणी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते आपल्या कारमधून परभणीकडे निघाले होते. त्यावेळेस त्यांच्या कारसमोर दुसरी कार उभी करण्यात आल्याने त्यांनी वाहन थांबवून काच खाली घेताच समोरच्या वाहनातून पांढर्या रंगाचे टीशर्ट परिधान केलेले अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील दोन तरूण उतरले आणि शर्मा यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो शर्मा यांनी चुकवला. त्यानंतर ते दोघे गाडीतील 14 लाख 50 हजार रुपये ठेवलेली बॅग घेण्याचा प्रयत्न करू लागले. वर्मा यांच्याशी धक्काबुक्की करून त्यांच्या कारमध्ये असलेल्या बॅग काढण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यास विरोध करीत असताना वर्मा यांना धक्काबुक्की करण्यात आली. शर्मा यांनी ती बॅग दोन्ही पायांमध्ये घट्ट पकडून ठेवली. मग त्या दोघांनी शर्मा यांना गाडीबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि 14 लाख 50 हजार रुपये ठेवलेली बॅग घेऊन ते दोघे कारने गंगाखेडच्या दिशेने पसार झाले.
या घटनेची माहिती दैठणा पोलीस, पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. दरम्यान, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये हे करीत आहेत.