परभणीच्या भाविकाने ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रवेशद्वाराठी ११ किलो चांदी अर्पण

Spread the love

-परभणीच्या डॉक्टर दांपत्याची सेवाभक्ती

परभणी ता.२०/प्रतिनिधी
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास तब्बल ११ किलो चांदीचा वापर करून बनविलेले प्रवेशद्वार येथील डॉक्टर दांपत्याने माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होण्यापूर्वी बुधवारी (दि. १८) अर्पण केली.सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार तयार करून त्यावर ११ किलो चांदीचा मुलामा मढविण्यात आला आहे. या प्रवेशद्वारावर भगवान विष्णूचे आयुध चक्र, गदा, पद्म व शंख आदींच्या सुरेख नक्षी कोरल्या गेल्या आहेत. मंदिर समितीच्या कार्यालयात समितीचे मुख्य विश्वस्त योगी निरंजन दास आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी डॉक्टर दांपत्याचा सन्मान केला. परभणी येथील अस्थिरोगतज्ञ डॉ. श्रीराम मसलेकर आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. पद्मजा मसलेकर या आध्यात्मिक सेवाभाव असलेल्या दांपत्याने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास हे प्रवेशद्वार अर्पण केले आहे.

डॉ. श्रीराम मसलेकर यांनी वाढदिवसानिमित्त एक मार्चला आळंदी येथे मंदिर परिसरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २०० पेक्षा अधिक रुग्ण, सेवेकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. मंदिर परिसरातील अध्यात्मिक वातावरणाच्या सानिध्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास प्रवेशद्वार अर्पण करण्याची संकल्पना त्याच्या मनात आली. या संकल्पनेनुसार मसलेकर दांपत्याने मंदिर समितीचे परवानगी घेऊन काही महिन्यातच गाभाऱ्यासाठी प्रवेशद्वार तयार केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होण्याच्या एक दिवस आधी हे प्रवेशद्वार संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात अर्पण केले.डॉ. मसलेकर दांपत्याच्या या भक्ती, सेवा आणि अध्यात्मिक वृत्तीची वारकरी व भक्त मंडळीत चर्चा होत आहे.

                               _______________

You cannot copy content of this page