परभणी जिल्ह्यात शिवसेना पदाधिकारी जाहीर;गंगाप्रसाद आणेराव जिल्हाप्रमुख, डॉ.विवेक नावंदर महानगरप्रमुख
परभणी ता.६ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. विधानसभा परभणी व गंगाखेड कार्यक्षेत्रासाठी गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हाप्रमुखपदी, तर परभणी शहर महानगरप्रमुखपदी डॉ.विवेक नावंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकातून अधिकृतरीत्या करण्यात आली.
गंगाप्रसाद आणेराव हे मागील तीन ते साडेतीन दशकांपासून शिवसेनेचे निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्ते म्हणून काम करत आले आहेत. पक्षाने त्यांना यापूर्वी तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख अशी महत्वाची जबाबदारी दिली होती. तसेच, परभणी बाजार समिती सदस्य व जिल्हा परिषद सभापती म्हणून त्यांनी शिवसेनेच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणूनही कार्य केले आहे. त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य व जनसंपर्क लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे.
तर परभणी शहर महानगरप्रमुखपदी निवड झालेले डॉ.विवेक नावंदर हे देखील पक्षातील जुन्या आणि सक्रिय कार्यकर्त्यां पैकी एक आहेत. यापूर्वी त्यांना सहसंपर्क प्रमुख तसेच नगरसेवक पदाची संधी मिळाली होती. त्यांनी शहरात पक्ष संघटन मजबूत करण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.
गंगाप्रसाद आणेराव आणि डॉ.विवेक नावंदर यांच्या नियुक्त्यांमुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना संघटनेला नवे बळ मिळणार असून, याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर उमटणार, असा अंदाज वर्तवला जात आहे.मागील दीड वर्षांपासून परभणी जिल्हा शिवसेनेत जिल्हाप्रमुख व महानगरप्रमुख हे पदे रिक्त होती. त्यामुळे ही नियुक्ती होणे हे जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी दिलासादायक ठरले आहे. निवड झालेले दोन्ही पदाधिकारी हे तरुण, तडफदार आणि जनसंपर्कात सक्रिय असल्याने आगामी निवडणुकां मध्ये शिवसेनेला त्यांच्या नेतृत्वाचा मोठा फायदा होईल, असे पक्षातील वरिष्ठांचे मत आहे.गंगाप्रसाद आणेराव व डॉ.विवेक नावंदर यांच्या नियुक्त्यांची घोषणा होताच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. परभणी शहर व जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
या निवडीचे स्वागत शिवसेना उपनेते खासदार संजय उर्फ बंडु जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, सुधाकर खराटे,दशरथ भोसले,अनिल डहाळे, भगवानराव धस, काशिनाथ काळबांडे, नंदु पाटील आवचार, विष्णू मुरकुटे, श्रीकांत क-हाळे, मुंजाभाऊ कदम, रामप्रसाद रणेर, साहेब दादा कदम,संतोष एकलारे,बंडुअप्पा बनसोडे, विकास वैजवाडे,शामराव कदम, राजु अण्णा एकलारे, शंकर गलांडे, गजानन हिवरे,प्रा.गोविंद कदम, मुन्ना राठोड,रमेश ठाकूर, बालाजी वैद्य, गोविंद सोलव, मनोज उबाळे आदींनी केले.












