परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर; शेती उद्ध्वस्त, जनजीवन विस्कळीत नद्या-नाले तुडुंब, येलदरी, दुधना प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग; हवामान खात्याचा यलो अलर्ट
परभणी, दि.२२ (प्रतिनिधी) : Parbhani Heavy Rain News मागील तीन ते चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात अविरत पावसाचा जोर कायम असून या संततधारेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वस्त्या पाण्याखाली गेल्याने लोक त्रस्त झाले आहेत. नदी-नाल्यांना आलेल्या पुरासोबतच मध्यम व लघू धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या पुरामुळे काही पूल पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क अधूनमधून तुटत आहे.

🔹 रात्रीच्या पावसाचा तडाखा
सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पुर्णा, जिंतूर,पालम, गंगाखेड, सोनपेठ,मानवत,सेलु,सह परभणी शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी झाली. या पावसाने शहरासह ग्रामीण भाग झोडपून काढला.जिल्हातील बहुतांश लहान मोठ्या नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत.घराघरांत पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. ग्रामीण भागातील ओढ्या-नाल्यांनी उफान धरल्याने गावांभोवती पूरपाणी साचले आणि ग्रामस्थ अडचणीत सापडले. सोमवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचे वाटले, परंतु दुपारी उकाडा वाढून सायंकाळी पुन्हा संततधार कोसळू लागली.सोमवारी मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला.यामुळे जिल्ह्यातील अनेक दुर्गा मंडळांना ऐन पावसात दुर्गा स्थापना करावी लागली.

🔹 धरणांचे दरवाजे उघडले
येलदरी प्रकल्पाचे दहा तसेच लोअर दुधना प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पुर्णा, दुधना , पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. याशिवाय गोदावरीवरील बंधाऱ्यांचे दरवाजे देखील उशिरा रात्री उघडण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

🔹 पूरस्थिती गंभीर
अविरत पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे पिके वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. नागरिकांना घरातील पाणी उपसण्याचे मोठे संकट ओढवले आहे.
🔹 हवामान खात्याचा इशारा
सध्याच्या परिस्थितीला धरून हवामान विभागाने पुन्हा ‘यलो अलर्ट’ जाहीर केला असून पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
👉 प्रशासनाचे आवाहन :
पूरकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे प्रशासनाने कळवले आहे.