Parbhani Accident;उज्जैनला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू,एक गंभीर

Spread the love

अकोली पुलाजवळ मध्यरात्रीची घटना; गंगाखेड परिसरात हळहळ

जिंतूर,ता १२/प्रतिनिधी :
देवदर्शनासाठी मध्यप्रदेशातील उज्जैनकडे रवाना झालेल्या पाच भाविकांच्या वाहनाला जिंतूर तालुक्यातील अकोली पुलाजवळ गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गंगाखेड व जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील पाच जण उज्जैन येथे दर्शनासाठी खासगी वाहनाने निघाले होते. जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलाजवळ वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले आणि मदतकार्य सुरू केले.

सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे व चालक पवार यांनी जखमींना तत्काळ जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी आश्रोबा औटी (२८, रा. खडकपुरा), बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (३०, रा. तारुमोहल्ला), कृष्णा बालाजी गुट्टे (२८, रा. कोद्री रोड) आणि रोहन संजय राठोर (२७, रा. लक्ष्मीनगर) यांना मृत घोषित केले.

गंभीर जखमी झालेल्या गोपाळ गणेश रोकडे (२८, रा. खडकपुरा) याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बिट जमादार दत्तात्रेय गुंगाणे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनीही घटनास्थळी व रुग्णालयात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.

You cannot copy content of this page