Parbhani Kalgav Grampanchayat गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची मागणी

Spread the love

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने १६ सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा

पूर्णा ता.४ (प्रतिनिधी) ग्रामपंचायत कळगांव येथील विविध शासकीय योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार संघटनेतर्फे गटविकास अधिकारी, पंचायत समिती पूर्णा यांना देण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून घरकुल योजना, वित्त आयोग निधी, रस्ते, नाली, सभागृह, उपआरोग्य केंद्र, पाणी फिल्टर प्रकल्प तसेच ग्रामसभा ठरावांमध्ये बोगस कामे दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामसेवक, अभियंते आणि विस्तार अधिकाऱ्यांनी संगनमत करून कामे केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रहार संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या :

  • घरकुल योजना (2022-25) : पीएम आवास, रमाई, सबरी व इतर योजनांतील लाभार्थींची माहिती, जिओ टॅग फोटोसह सादर करणे.
  • 14वा व 15वा वित्त आयोग निधी : सन 2022 ते 2025 मधील निधी प्राप्ती व खर्चाचे विवरण.
  • उपआरोग्य केंद्र : प्राप्त निधी असूनही सेवा सुरू न झाल्याबाबत चौकशी.
  • MRGS रस्ते व इतर कामे : निधी व कामांचे सविस्तर तपशील.
  • पाणी फिल्टर प्रकल्प : निधी असूनही प्रकल्प बंद असल्याची चौकशी व गावकऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करणे.
  • दिव्यांग 5% निधी : लाभार्थ्यांची नावे, निधीचे वितरण व साहित्य वाटपाचे पुरावे.
  • ग्रामसभा ठराव (2023-25) : सत्य प्रत सादर करणे.
  • घरकुलापासून वंचित लाभार्थी : अल्पभूधारक, दिव्यांग, निराधार, भूमिहीनांना प्राधान्य देणे.
  • इतर विभागांमार्फत आलेला निधी (2023-25) : निधीचा तपशील व खर्चाचे विवरण.

या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वता. गटविकास अधिकाऱ्यांनी कळगाव येथे येऊन चौकशी करून अहवाल द्यावा, अन्यथा १६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रहार व गावकरी यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.निवेदनावर प्रहार तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के पिंपरणकर, सर्कल प्रमुख विष्णु बोकारे यांच्यासह सचिन सूर्यवंशी, दिगंबर पोले, नागनाथ भांगे, अनिल वावळे, पिंटू सूर्यवंशी, दत्ता पोले, हनुमंत पोले, सिद्राम पोले, रहिमान शेख, लिंबाजी पोले, पप्पू सूर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.

You cannot copy content of this page