गावठी बंदुक,धारधार शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघे जेरबंद
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;१० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
परभणी/प्रतिनिधी:
जिल्ह्यात अवैध व घातक शस्त्र बाळगत असल्याबाबतची गुप्त माहिती येथील स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचत गावठी पिस्टल, तलवार आणि इतर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांविरूध्द कारवाई करत अटक करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.29) स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने यशस्वी केली.
या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नांदखेडा येथील सराईत गुन्हेगार शेरखान पठाण आणि त्याचे काही मित्र शेरखान याच्या घरी व चारचाकी वाहनामध्ये धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने पकडले. गुन्हेगारांमध्ये दुसरा एक सराईत गुन्हेगार हनुमंत रमेश सोनटक्के, वय 21 वर्षे रा. वाणी पिंपळगाव ता. पालम हा देखील मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातील स्कार्पीओ या चारचाकी गाडीत (एमएच 23 एआर 2939) घातक शस्त्र व तलवार आणि इतर साहित्य मिळून आले. तसेच घरझडतीत देखील शस्त्रे मिळून आली. त्यामध्ये एक अवैध अग्नीशस्त्र, चार जिवंत काडतुस, खंजीर, गुप्ती, कत्ती, रॉड आदी घातक शस्त्र मिळून आले. तसेच शस्त्र व चारचाकी वाहनासह एकुण 10 लाख 37 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे शेरखान उर्फ शेरू समंदर खान पठाण, वय 23 रा. नांदखेडा ता. परभणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. तर हनुमंत रमेश सोनटक्के याच्यावर परभणी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर चुडावा पोलिस स्टेशन येथेही गुन्हा नोंद आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राजीव मृत्येपोड, पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारूखी, रविकुमार जाधव, सुर्यकांत फड, जयश्री आव्हाड, शेख रफीयोद्दीन आदींसह ग्रामीण पोलिस पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गडदे, अंमलदार कादरी, सायबर पोलिस स्टेशनचे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.