परभणी मनपाच्या महापौरपदी सय्यद इकबाल,उपमहापौरपदी गणेश देशमुख
परभणी,ता.१२(प्रतिनिधी)
महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांनंतर अखेर महापौर आणि उपमहापौर पदांचा फैसला झाला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपदी उबाठाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेश देशमुख यांची निवड जाहीर करण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निकालाची अधिकृत घोषणा केली.

गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बी. रघुनाथ सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या प्रारंभी महापौर निवडीची प्रक्रिया हाती घेण्यात आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर उबाठाच्या ५, काँग्रेसच्या ३, भाजपच्या ३ आणि राष्ट्रवादीच्या १ उमेदवाराने माघार घेतली.
महापौर पदासाठी उबाठाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा आणि भाजपचे तिरुमला मुकुंद खिल्लारे यांच्यात थेट लढत झाली. मतदानात सय्यद इकबाल यांना ३९ मते मिळाली, तर खिल्लारे यांना २६ मते पडली. १२ मतांच्या फरकाने सय्यद इकबाल यांचा विजय निश्चित झाला.

उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे गणेश देशमुख आणि राष्ट्रवादीच्या नाजेमा बेगम यांच्यात सामना रंगला. देशमुख यांना ३८ मते मिळाली, तर नाजेमा बेगम यांना २७ मते मिळाली. त्यापूर्वी उपमहापौर पदाच्या शर्यतीतून उबाठाचा १, काँग्रेसचे ३ आणि भाजपचे २ उमेदवार माघारले होते.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत खा. संजय जाधव, माजी खा. तुकाराम रेंगे, आ. राहुल पाटील, माजी आ. सुरेश देशमुख, डॉ. विवेक नावंदर, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, अॅड. मुजाहिद खान, सय्यद खादर, रामभाऊ घाटगे, अरविंद देशमुख यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व मनपाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले.
उमेदवारी माघारीची नावे
महापौर पदासाठी उबाठाकडून दिलीप ठाकूर, सय्यद समी सय्यद साहेबजान, शाम खोबे, सरफुद्दीन सिद्दिकी, प्रतिभा अतुल सरोदे; काँग्रेसकडून भगवानराव वाघमारे, गणेश देशमुख, गुलमीर खान; भाजपकडून डॉ. केदार खटींग, सौ. मिनाताई सुरेश वरपूडकर, रितेश झांबड; तर राष्ट्रवादीकडून अर्जुन सामाले यांनी उमेदवारी मागे घेतली.उपमहापौर पदासाठी भाजपचे विश्वजीत बुधवंत, तिरुमला खिल्लारे; उबाठाचे श्याम खोबे; काँग्रेसचे भगवान वाघमारे, गुलमीर खान यांनी माघार घेतली.
व्हिपविरोधात मतदानाची चर्चा
महापौर निवडीत हात वर करून मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी पक्षाच्या व्हिपविरोधात मतदान करत उबाठाचे उमेदवार सय्यद इकबाल यांना पाठिंबा दिला. तसेच प्रभाग क्र. ७ मधील अपक्ष सदस्य रजियाबेगम मो. युनूस यांनीही सय्यद इकबाल यांच्या बाजूने मत नोंदवले. त्यामुळे उबाठा व काँग्रेसचे अधिकृत संख्याबळ ३७ असतानाही त्यांना ३९ मते मिळाल्याने या मतदानाची विशेष चर्चा रंगली आहे.











