परभणी;बसस्थानक परिसरातील लाॅजमधुन 23 किलो गांजा जप्त..
परभणी;बसस्थानक परिसरातील लाॅजमधुन 23 किलो गांजा जप्त..
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कार्यवाही….
परभणी/प्रतिनिधी
शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजमधून जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने 23 किलो गांजा जप्त केल्याची कार्यवाही शुक्रवारी ता.12 रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास केली. या कारवाईत गांजासह एकूण 1 लाख 63 हजार 785 रुपयांचा मुद्देमाला सह दोन जणांना पथकाने ताब्यात घेत. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास परभणीतील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये काही व्यक्तींनी अंमली पदार्थ गांजा अवैध विक्रीसाठी आणला असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक श्री. मीन यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश कुमार, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस, फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अजहर पटेल, अरुण कांबळे, दीपक मुंडे, विष्णू भिसे, यांच्यासह कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील, कर्मचारी आईटवार, श्री.लटपटे, श्री.वाघमारे, श्री.गायकवाड, रामा कदम आदींनी शुक्रवारी (दि.12) मध्यरात्री बाराच्या सुमारास लॉज परिसरात छापा टाकला.
त्यावेळी तेथ दोन व्यक्ती आढळून आल्या. त्यांची चौकशी करीत त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळील तीन वेगवेगळ्या पिशव्यात अंमलपदार्थ गांजा आढळून आला. एका प्रवाशी बॅगमध्ये प्लास्टीक चिकटपट्टीच्या पॅकबंद पाकिटात दहा किलो 33 ग्रॅम वजनाचा अंदाजे 51 हजार 670 रुपयांचा गांजा अवैध विक्रीसाठी साठवलेला पथकास आढळून आला. दुसर्या बॅगमध्ये नऊ किलो 36 ग्रॅम अंदाजे 45 हजार 180 रुपये किंमतीचा तर अन्य तिसर्या बॅगमध्ये 16 हजार 935 रुपये किंमतीचा तीन किलो 387 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पथकाने एक लाख 13 हजार 785 रुपयांचा गांजा जप्त केला. त्याचबरोबर या कारवाईत एक मोटारसायकल, मोबाईल असा एकूण एक लाख 63 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दाभाडे व युवराज भदर्गे या दोघांना पथकाने ताब्यात घेत कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा अधिक तपास नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत. घटनास्थळास सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भेट दिली.












